पुणे : क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या मास्टर बलास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या आयुष्याबाबत बोलताना सांगितलं की, "आयुष्यात शॉर्टकट घेणं चुकीचं असून, यश मिळालं नाही तर, अपयश पचव, पण त्यासाठी शॉर्टकट घेऊ नकोस, असा धडा मला घरातूनच मिळाला होता. शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत मी खूपच मस्ती करायचो. झाडाच्या कैऱ्या पाड, कुणाच्या गाडीची हवा सोड असे उद्योग करायचो. त्यामुळं माझा मोठा भाऊ मला रमाकांत आचरेकर सरांकडं घेऊन गेला आणि तेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरूवात केली."
आयुष्यात कुटुंबाला खूप महत्व : एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सचिन तेंडूलकरनं आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सचिन तेंडुलकर म्हणाला की, "आयुष्यात कुटुंब या घटकाला खुप महत्व आहे. आपल्या चांगल्या क्षणी, अडचणीच्या प्रसंगी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्यासोबत तुमचं कुटुंबच असतं. क्रिकेट खेळत असताना घर, ड्रेसिंग रूम आणि करोडो भारतीय ही माझी फॅमिलीच होती."
पुणे कायमच माझ्यासाठी विशेष : "शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत मी खूपच मस्ती करायचो. त्यामुळं मला सर्वजण मस्तीखोर म्हणायचे. सुट्टीच्या दिवसात मी, झाडाच्या कैऱ्या पाड, कुणाच्या गाडीची हवा सोड असे उद्योग करायचो. त्यामुळं, माझा मोठा भाऊ मला रमाकांत आचरेकर सरांकडं घेऊन गेला आणि माझं क्रिकेट सुरु झालं. तसंच माझी बहीण लग्नानंतर पुण्यात राहायला आली त्यामुळं मी, पण कुठेतरी थोडासा पुणेकर आहे," असं सचिन म्हणाला. "मुंबईसाठी जुनिअर लेव्हलला खेळायची सुरुवात १९८५ साली पुण्यात झाली. त्यामुळं पुणे कायमच माझ्यासाठी विशेष आहे" अशी भावना सचिननं व्यक्त केली.
आयुष्यात शॉर्टकट न घेता काम करणं महत्वाचं : "१९८३ साली भारतानं क्रिकेटचा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यामुळं, आपण एकदा तो उचलायला हवा अशी भावना सहा वर्षांचा असतानाच माझ्या मनात आली होती. माझे कोच आचरेकर सर माझ्याकडून कसून सराव करून घ्यायचे. सरावानंतर स्टम्पवर एका रुपयांचं नाणं ठेवायचे आणि म्हणायचे की, तू १० मिनिटं आउट व्हायचं नाहीस. शिवाजी पार्कच्या मैदानात कुणीही तुझा झेल घेतला की, तू आउट असा नियम आचरेकर सरांनी मला घालून दिला. त्यामुळं मला १० मिनिटे आऊट न होता खेळावेच लागायचं. फलंदाजी करताना चेंडू हवेत मारता येत नव्हता. सरांच्या या शिकवणीतून आयुष्यात शॉर्टकट न घेता मानसिकदृष्टया सक्षम होण्याचा गुण अवगत झाला," अशी आठवण सचिननं यावेळी सांगितली.