पुणे Mohan Bhagwat :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल पुण्यात शंकर दिनकर काणे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी "मी देव झालो, असं स्वत: म्हणू नये तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या," असा खोचक टोला लगावला. त्यामुळं आता मोहन भागवत यांचा टोला नेमका कुणाला? असा सवाल विचारला जात आहे. शंकर दिनकर काणे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे विधान केलं. या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सचिव जयवंत कोंडविलकर, रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव यांच्यासह बांधकाम विकासक नितीन न्याती उपस्थित होते.
मोहन भागवत नेमकं काय म्हणाले : "प्रत्येकजण आपल्या कामातून आदरणीय व्यक्ती बनू शकते. पण आपण त्या पातळीवर पोहोचलो की नाही हे आपण स्वतः कधी ठरवू शकत नाही. ते इतरांनी ठरवावं लागतं. त्यामुळं मी देव झालो, असं स्वत: म्हणू नये. तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या. क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखं कधी होऊ नये. चमकणं डोक्यात जातं. वीज होऊन चमकण्यापेक्षा पणती होऊन तेवत राहावं," असं मोहन भागवत म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच एक वक्तव्य चर्चेत आलं होतं. त्या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर निशाणी साधला होता. आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी लगावलेला टोला मोदींसाठी तर नाही ना? अशी चर्चा होत आहे.