नागपूर- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून महायुतीमधील आमदारांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आज बौद्धिक घेण्यात येणार आहे. या बौद्धिकाला उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे हजर राहिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार का, याबाबत संदिग्धता व्यक्त होत आहे.
Live updates
- अजित पवार यांनी रेशीमबागला भेट देणे टाळलं आहे. गेल्या वर्षीदेखील त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला भेट दिली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीमध्ये सामील झाली असली तरी ती त्यांच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याशी सुसंगत नाही, असे त्यांनी यापूर्वी म्हटले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, छत्रपती शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचे पालन आणि अंमलबजावणी करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवर आक्षेप घेतला होता.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सकाळी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) दुसरे सरसंघचालक एम.एस.गोळवलकर यांच्या स्मृतिस्थळी आदरांजली वाहिली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीदेखील हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " माझे राष्ट्रीय स्वयंसेवकाबरोबर लहानपणापासून नातं आहे. मी लहानपणी संघाच्या शाखेत जायचो आहे. संघ जोडणारा असून तोडणारा नाही. शिवसेनचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारसारखे आहेत".
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुमसर येथील आमदार राजू कारेमोरे संघाच्या स्मृती मंदिरात दाखल झाले आहेत.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार संघाच्या मुख्यालयात आले असले तरी अद्याप उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे एक-दोन आमदार वगळता उर्वरित आमदार आलेले नाहीत
- मंत्रिपदापासून वंचित राहिलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारदेखील बौद्धिकासाठी संघ मुख्यालयात दाखल झाले आहेत.