मुंबई RPI President Ramdas Athawale:देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी विराजमान होतील आणि एनडीएला निश्चितच 400 जागा मिळतील असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षांत देशाने विकास साधला आहे. त्याच्यामुळे यापुढेही जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पसंती देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिर्डीची जागा मिळायला हवी होती :यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक होतो आणि ती जागा मला मिळायला हवीच होती. तर सोलापूरची जागा ही आम्हाला मिळणे अपेक्षित होते; मात्र त्यासाठी मी वेगळा मार्ग पत्करला नाही ही माझी चूक झाली. जर मी शरद पवारांना आधी भेटलो असतो तर नक्कीच मला सोलापूरची जागा आमच्या पक्षाला सोडली गेली असती असंही ते यावेळी म्हणाले.
कॅबिनेटमंत्री पद आणि राज्यात मंत्रिपद मिळणार :आगामी सरकारमध्ये आपल्याला आता राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळणार आहे. तर राज्यातही 4 जून नंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्या पक्षाला एक मंत्रिपद दिले जाणार आहे. विधान परिषदेची एक जागाही आपल्याला देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केले आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तर आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला किमान आठ ते दहा जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. मात्र पाच ते सहा जागा तरी आम्ही घेणारच असा दावाही त्यांनी केला.