मुंबई :पुणे ग्रामीण पोलिसांनी एक कार पकडून त्यामधील 5 कोटी रुपयाची रोकड जप्त केली आहे. मात्र या कारवाईवर आता विरोधकांकडून मोठी टीका करण्यात येत आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यावर आरोप केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. "हा विधानसभा निवडणुकीसाठी 25 -25 कोटी रुपयांचा पहिला हप्ता आहे. यातील एक गाडी पकडण्यात आली, इतर चार गाड्या कुठं आहेत," असा सवाल रोहित पवार यांनी केला.
कारमधून पकडले 5 कोटी रुपये :विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे. या बंदोबस्तात सोमवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी एका कारमधून तब्बल 5 कोटी रुपयाची रोख रक्कम पकडली आहे. ही रोख रक्कम साताऱ्याकडं नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी पोलिसांनी ही रोख कोणाची होती, कुठं नेण्यात येत होती, याबाबतची अधिकृत माहिती अद्यापही दिली नाही. मात्र ही रक्कम सोलापूर जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराची असल्याचा आरोप उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला.
एक गाडी पकडली चार कुठं गेल्या, रोहित पवारांचा आरोप :राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर मोठा हल्लाबोल केला. "सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या #डोंगार_झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत?