पुणे Rohit Pawar Allegations :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार हे अजित पवार यांच्याविरोधात आक्रमक झाले. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दुधाच्या खरेदीत सरकारनं मोठा घोटाळा केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. याबाबतच्या 11 फाईल्स माझ्याकडं आल्या असून आज (22 मार्च) त्यांनी त्यातील 2 फाईल्सचा पर्दाफाश केल्याचा दावा केला. यावेळी रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप पुण्यात केले आहेत.
अज्ञात व्यक्तीनं 11 निनावी फाईल्स पाठवल्याचा दावा :राज्य सरकारनं दूध खरेदीत 80 कोटीची दलाली घेतल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तसंच मला एका अज्ञात व्यक्तीनं 11 निनावी फाईल्स पाठवल्या असल्याचं सांगत, या 11 फाईल्सपैकी दोन फाईल्सची माहिती त्यांनी यावेळी दिली. तर लवकरच 9 फाईल्सची देखील पोलखोल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सरकारचा दूध विक्रेत्या कंपन्यांबरोबर करार :राज्यात एकूण 552 शासकीय आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना चांगल्या आरोग्यासाठी दररोज 200 मिली दूध दिलं जावं, अशी अधिसूचना राज्य सरकारनं काढली होती. या आश्रम शाळांमध्ये 1.87 लाख विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांना दूध देता यावं, यासाठी सरकारनं दूध विक्रेत्या कंपन्यांबरोबर करार केला. यात मोठा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
कंत्राटदाराला दिले 146 रुपये प्रति लिटर दरानं पैसे :यावेळी बोलत असताना ते म्हणाले की,"मला निनावी व्यक्तीनं 11 फाईल्स पाठवल्या आहेत. त्यापैकी दोन फाईल मी आज घेऊन आलोय. यामध्ये महत्वाच्या खात्यातील भ्रष्टाचाराची माहिती आहे. पहिल्या फाईलमध्ये दूध घोटाळ्याची माहिती आहे. राज्यात 552 आश्रम शाळा असून तेथील मुलांच्या आरोग्यासाठी दररोज दूध मिळण्याचा जीआर काढला आहे. या शाळेतील 1 लाख 87 हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी 200 मिली दूध देणं आवश्यक होतं. पहिल्या करारात अमुल आणि चितळेकडून दूध घ्यायला हरकत नाही असं म्हटलंय. पहिला करार 2018-2019 तर दुसरा करार 2023-2024 दरम्यान झाला. या करारानुसार 146 रुपये प्रति लिटर दरानं कंत्राटदारास पैसे देण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून दूध तीस रुपये प्रति लिटर तर टेट्रा पॅक पंचावन रुपये प्रति लिटरनं खरेदी करायला हवं होतं."
सरकारनं 85 कोटींऐवजी मोजले 165 कोटी :"सरकारच्या या दूध खरेदीसाठी 85 कोटी रुपये खर्च यायला हवा होता. मात्र प्रत्यक्षात 165 कोटी रुपये देण्यात आले. यात 80 कोटींची दलाली देण्यात आली. यासाठी आंबेगाव तालुक्यातील एका खासगी दूध उत्पादक संस्था आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थेला कंत्राट देण्यात आलं. त्यामुळं जे विकासासाठी आम्हाला सोडून गेले असा दावा करतायत, त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच हे सर्व ठरवलं होतं का?," असा खोचक सवालही रोहित पवार यांनी केला.
समाजकल्याण विभागात घोटाळ्याचा आरोप :समाजकल्याण विभागातील हे कंत्राट 1 हजार 50 कोटी रुपयांचे असून हे कंत्राट तीन वर्षांसाठीचे आहे. यापूर्वी ही कंत्राटं डिसेंट्रलाईज पद्धतीनं होत होती, ती कंत्राटं आता सेंट्रलाईज करण्यात आली आहेत. एस सी, एस टी विद्यार्थ्यांना आहार पुरवण्यासाठी हा करार होता. यासाठी चार कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं, असंही रोहित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा :
- "मी माझ्या आजोबांना सोडून जाणार नाही"; आमदार रोहित पवारांचा स्पष्ट निर्धार
- रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीविताला धोका, सुरक्षा द्यावी- सुप्रिया सुळेंचं पोलीस अधीक्षकांना पत्र - Supriya Sule writes letter to SP
- कॉंग्रेसच्या तीन राज्यातील पराभवाचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही - रोहित पवार