मुंबई Reactions On Ritesh Deshmukh Emotional Speech : निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात उभारण्यात आलेल्या दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आज (18 फेब्रुवारी) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. यादरम्यान अभिनेता रितेश देशमुखला अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. भाषणादरम्यान रितेश देशमुखला ढसाढसा रडताना बघून उपस्थिताचेही डोळे पाणावले. रितेश देशमुखचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं बघायला मिळतंय. रितेश देशमुखच्या या भाषणावरून राजकीय नेत्यांनीही आपल्या हळव्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शरदचंद्र पवार गटाकडून एक्सवर पोस्ट शेअर :रितेश देशमुख यांच्या भाषणादरम्यानचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. "थोरामोठ्यांचा आदर करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. प्रत्येक घराघरात हेच संस्कार केले जातात," असंही पोस्टमध्ये म्हटलंय. पुढं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून "जेव्हा स्वार्थाचा विचार मनात येतो, तेव्हा सगळी नाती मागे पडतात. अशातच मग घर आणि पक्ष फोडावा लागला तरी कसलाच विचार लोक करत नाही", असा टोलाही लगावण्यात आला आहे.
राजकारण्यानं कसं भाषण करावं हे विलासरावांकडून शिकलं पाहिजे :विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटले की, "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पुतळ्याचं अनावरण आज लातूर येथे संपन्न झाले. उत्कृष्ट पुतळा निर्माण करण्यात आला आहे. स्व. विलासराव देशमुख यांना जाऊन अनेक वर्षे झाली. पण उपस्थितांच्या डोळ्यातील पाणी पाहून आजही त्यांचे लोकांच्या मनातील स्थान कायम आहे, हे सिद्ध होते. लोकं एखाद्या व्यक्तिला त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे स्मरणात ठेवतात. स्व. विलासराव देशमुख साहेब यांनी मराठवाड्यासाठी आणि संपूर्ण राज्यासाठी विस्तृत काम केले आहे. आटपाडीच्या साखर कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी ते आले होते. तेव्हा त्यांचे भाषण पहिल्यांदा ऐकलं. राजकारण्यानं कसं भाषण करावं हे विलासरावांकडून शिकले पाहिजे. मी त्यांच्या मंत्रिमंडळात अधिकतम काम केलं आहे. त्यामुळं त्यांचं आणि माझं घनिष्ट ऋणानुबंध होतं."