मुंबई Major Vasant Jadhav Hunger Strike : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात (Mumbai Bomb Blast) दादरचा बॉम्ब निकामी करणारे निवृत्त मेजर वसंत जाधव अद्यापही केंद्र आणि राज्य सरकारपासून दुर्लक्षित आहेत. त्यावेळी स्कूटरमध्ये ठेवलेला 12 किलो आरडीएक्सचा बॉम्ब निकामी करून त्यांनी दादरमधील हजारो जीव वाचवले होते. मात्र, त्यांच्या शिफारशीवरून सहा अधिकाऱ्यांना योग्य तो सन्मान देणाऱ्या सरकारनं त्यांनाच उपेक्षित ठेवलंय. तसंच पत्रव्यवहार करूनदेखील प्रशासन दखल घेत नसल्यानं वसंत जाधव यांनी आता दादर परिसरातच उपोषण करण्याचा मार्ग निवडला आहे.
336 हून अधिक वेळा पत्रव्यवहार : निवृत्त मेजर वसंत जाधव यांनी आजपर्यंत राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, नागरी हवाई वाहतूकमंत्री, सार्वजनिक तक्रार निवारणमंत्री आणि डीजी बीसीएएस यांना 336 हून अधिक पत्रं लिहून आपल्यावर झालेल्या अन्याय दूर करण्याची विनंती केली. मात्र, अद्यापही यावर त्यांना उत्तर मिळालेलं नाही. याप्रकरणी ईटीव्ही भारतशी संवाद साधत असताना वसंत जाधव यांनी आपली खंत बोलून दाखवली. तसंच 31 वर्षानंतर ज्या ठिकाणी नायगाव क्रॉस रोड येथे टाईम बॉम्ब निष्क्रिय त्याच ठिकाणी ते येत्या 14 मार्चला उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी सांगितलं.