मुंबई : राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन होऊन सदस्यांनी आमदारकीची शपथही घेतली. या पुढील टप्पा हा मंत्रिमंडळ विस्ताराचा असून, मंत्रिपदासाठी अनेकांनी जोरदार लॉबिंग सुरू केलं आहे. शिवसेनेच्या आमदार आणि माजी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आलं असून, त्यात 6 माजी मंत्री पास तर 2 माजी मंत्री नापास झाल्याची माहिती समोर आली. नापास मंत्र्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार नसल्यानं त्यांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा सुरू आहे.
महायुतीला प्रचंड बहुमत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात नवं सरकार स्थापन झालं असून, आतापर्यंत फडणवीस यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूरात सुरू होत आहे. त्यापूर्वी 12 डिसेंबरपर्यंत इतर मंत्र्यांचा शपथविधी केला जाणार आहे. यंदा महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असून, आमदारांची संख्याही वाढली आहे. त्यात अनुभवी आमदारांसोबत नवीन आमदार सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळं मंत्रिमंडळाच्या यादीत नावं येण्यासाठी अनेक नेत्यांनी लॉबिंग सुरू केली आहे.
दोन मंत्री नापास ठरले? : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांचं आणि माजी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी एका एजन्सीमार्फत आमदारांचं आणि माजी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार केलं असून, त्यात दोन माजी मंत्री नापास ठरले असल्यानं मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कार्डमध्ये मराठवाड्यातील माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि विदर्भातील माजी मंत्री संजय राठोड यांना नापास केलं गेल्याची चर्चा आहे. यावर अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. तसंच अनेक आमदार आणि माजी मंत्र्यांनी आपला नंबर लागावा यासाठी मोठी लॉबिंग सुरू केली आहे.