रायगडमध्ये ‘नोटा’ला सर्वाधिक पसंती, राज्याची स्थिती काय? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी - Lok Sabha Election Results 2024 - LOK SABHA ELECTION RESULTS 2024
Highest Use Nota Option In Raigad : लोकसभा निडणुकीत महाराष्ट्रात नोटा पर्यायाच्या टक्केवारीत घट झाल्याचं दिसून येत आहे. मात्र, रायगडमध्ये मतदारांनी नोटा पर्यायाचा सर्वाधिक वापर केल्याचं समोर आलं आहे. राज्यात 0.72 टक्के मतदारांनी नोटा पर्यायाला पसंती दिलीय.
मुंबई Highest Use Nota Option In Raigad: लोकसभा निवडणुकीत जशी चुरशीच्या लढतींची चर्चा झाली, तशीच चर्चा नोटावर पडलेल्या मतांचीही सुरू आहे. नोटाला देशात 0.99 टक्के मते मिळालीय. देशात नोटाला सर्वाधिक मते बिहारमध्ये मिळालीय. तर, महाराष्ट्रात 0.72 टक्के मतदारांनी नोटाला मतदान केलंय. राज्याचा विचार करता रायगडमधील मतदारांनी नोटाला सर्वाधिक पसंती दिल्याचं दिसून येत आहे.
2013 मध्ये प्रथम नोटाचा वापर : सप्टेंबर 2013 मध्ये एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला ईव्हीएमवर (Electronic Voting Machine) नोटा पर्याय देण्याचा आदेश दिला होता. 2013 मध्ये त्यानुसार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी कोणाला पसंती नसल्यास ईव्हीएममध्ये NOTA चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. 2013 मध्ये भारतातील मतदान प्रक्रियेत नोटाचा पर्याय प्रथमच वापरण्यात आला होता.
2019 च्या तुलनेत नोटा पर्यायाचा वापर कमी : देशात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमवर नोटा पर्यायाला 4 लाख 33 हजार 171 मतदारांनी पसंती दिली होती. हा आकडा एकूण मतांच्या 0.89 टक्के होता. त्यामुळं 2019 च्या निवडणुकीत मतदारांनी या पर्यायाचा अधिक वापर केला. 2019 च्या निवडणुकीत 4 लाख 88 हजार 766 मतदारांनी नोटाला मतदान केलं होतं. एकूण मतदानाच्या हे प्रमाण 0.9 टक्के होते. तर, यावेळी म्हणजेच 2024 च्या निवडणुकीत 4 लाख 12 हजार 815 मतदारांनी नोटा बटनाचा वापर केलाय. याचं एकूण प्रमाण 0.72 टक्के आहे. तसंच 2019 च्या तुलनेत नोटा बटनाचा वापर कमी झाल्याचं दिसून येत आहे.
सर्वाधिक वापर रायगडात : महाराष्ट्रात सर्वात जास्त नोटा पर्यायाचा वापर रायगडमध्ये करण्यात आलाय. 27 हजार 270 मतदारांनी यावेळी नोटा पर्यायाला पसंती दिलीय. त्यापाठोपाठ पालघर मतदारसंघात 23 हजार 385 मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केलाय. तर, ठाणे लोकसभा मतदारसंघात 17 हजार 901 जणांनी दिलेल्या उमेदवारांना नाकारत नोटाचा पर्याय निवडलाय. विशेष म्हणजे या तीन मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.