मुंबई -राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र माजी खासदार निलेश राणे हे आता भाजपाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. निलेश राणे यांचा राजकीय प्रवास हा शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, भाजप आणि आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना, असा झालाय. म्हणून त्यांच्या या प्रवेशाबाबत बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केलीय.
कुडाळमधून आमदारकीसाठी इच्छुक: माजी खासदार भाजपाचे नेते निलेश राणे हे उद्या सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश करीत आहेत. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, रावणालासुद्धा धनुष्य पेलता आलं नाही, ते त्याच्या छाताडावर पडलं इतकंच मी सांगेन, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केलीय. निलेश राणे यंदा कुडाळमधून आमदारकीसाठी इच्छुक होते. परंतु त्यांना भाजपाकडून उमेदवारी दिली गेली नसल्याने अखेर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. अशात ते आता कुडाळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. निलेश राणे यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्याशी होणार आहे.
नाना पटोले माझे मित्र :जागावाटपाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत. अशातच काँग्रेस हायकमांडने महाविकास आघाडीत समन्वयासाठी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली आहे. या विषयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, नाना पटोले आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्यावर आमचे पूर्वीपासून प्रेम आहे. त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. काँग्रेस पक्षाच्या व्यवस्थेविषयी मी मत व्यक्त करणे हे बरोबर नाही. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यात सुरुवात झाली असून, कदाचित आजची आमची बैठक ही फायनल असू शकते. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. नांदगाव ही शिवसेनेच्या विद्यमान आमदाराची जागा आहे. श्रीगोंदा ही भारतीय जनता पक्षाकडे असलेली जागा आहे. म्हणून ती आम्ही लढवावी, असा आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आमची लोक ही शिस्तबद्ध असल्याकारणाने ते पक्षाचा आदेश पाळतील त्याकरिता बंडखोरी होणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.