मुंबई Small Animal Hospital: उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्याचं स्वप्न होतं. ते आता पूर्ण झालंय. 'टाटा ट्रस्ट्स स्मॉल अॅनिमल हॉस्पिटल' असं या रुग्णालयाचं नाव आहे. 'स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल'ने आपल्या चाचणी टप्प्याचा भाग म्हणून देऊ केलेल्या मुख्य सेवांना आणि डेमो ऑपरेशन्सना मिळालेल्या यशानंतर, येथील अपॉइंटमेंट्स खुल्या करण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन मदत आणि अपॉइंटमेंट्स अशी घ्या : ॲनिमल हॉस्पिटल हे फोनलाइनद्वारे केलेल्या निश्चित वेळेसाठीच्या अपॉइंटमेंट्स स्वीकारेल. अपॉइंटमेंट आणि आपत्कालीन मदत फक्त (+9102231053105) या क्रमांकावर फोन करून किंवा हॉस्पिटलच्या वेबसाइटच्या माध्यमातून व्हॉट्सॲप टेक्स्ट पाठवून मिळवता येईल. यामुळं येथील टीमला प्रत्येक पाळीव प्राण्याला योग्य वेळ आणि लक्ष देणं शक्य होणार आहे.
हॉस्पिटलमध्ये विविध सेवांचा समावेश :हॉस्पिटलकडून प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट गरजानुसार सेवा पुरविण्यासाठी नेमलेल्या डॉक्टर्स, नर्सेस, तंत्रज्ञ आणि पाळीव प्राण्याच्या देखभालीतील मदतनीसाच्या तज्ज्ञ टीमद्वारे सेवेचा पुढचा टप्पा सुरू केला जाईल. भारतामध्ये प्राणी देखभालीचा एक नवा मापदंड प्रस्थापित करणाऱ्या या हॉस्पिटलमधील सेवामध्ये इमर्जन्सी रूम, प्राथमिक तपासणी आणि कन्सल्टेशन, इन-पेशंट देखभाल, डर्मेटोलॉजी, कार्डिओलॉजी आणि रेडिओलॉजी यांसह एमआरआय, सीटी, अल्ट्रासोनोग्राफी आणि इतर लॅबोरेटरीचा समावेश असेल. या हॉस्पिटलमध्ये पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होणार असलेल्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया वगळता इतर शस्त्रक्रिया केल्या जातील.