हैदराबाद Ramoji Rao Passes Away :रामोजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रामोजी राव यांचं आज (8 जून) पहाटे निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उच्च रक्तदाब, श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना 5 जून रोजी हैदराबादमधील नानकरामगुडा येथील स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे 4:50 वाजता त्यांचं निधन झालं. रामोजी राव यांचं पार्थिव त्यांच्या रामोजी फिल्मसिटी येथील कार्पोरेट ऑफिसमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. इथं त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि हितचिंतक त्यांच अंत्यदर्शन घेण्यासाठी येत आहेत.
निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त :16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावात एका कृषी कुटुंबात जन्मलेल्या, रामोजी राव यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली. मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजी राव यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. रामोजी राव यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केल्या जात आहे.
रामोजी राव यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो : पंतप्रधान मोदी
रामोजी राव यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, रामोजी राव यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी शिकलो. रामोजी राव यांच्या निधनाचं वृत्त क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी पोस्ट नरेंद्र मोदींनी केली आहे.
माध्यम आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी आपली छाप सोडली : राजनाथ सिंह
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी रामोजी राव यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. राजनाथ सिंह यांनी एक्सवर पोस्ट केलीय. त्यात ते म्हणालेत की, "माध्यम आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी आपली छाप सोडली. रामोजी राव यांच्या निधनानं मीडिया आणि चित्रपट उद्योगाचं मोठं नुकसान झालंय. रामोजी राव यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहे."
त्यांचं योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
"रामोजी राव यांच्या निधनानं भारतीय प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील एक टायटन गमावला आहे. त्यांनी ईनाडू वृत्तपत्र, ईटीव्ही न्यूज नेटवर्क आणि रामोजी फिल्म सिटी यासह अनेक उपक्रमांची सुरुवात केली. या उद्योगातील त्यांचं योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील", असं म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रामोजी राव यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
रामोजी राव यांच्या निधनानं चौथ्या स्तंभाचं नुकसान : मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामोजी राव यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. पत्रकारितेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील समस्या, जीवनशैली, आर्थिक, राजकीय जाणिवांना देशात सर्वदूर पोहोचविण्याचं रामोजी राव यांनी केलंय. पत्रकारांची पिढी घडवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. पद्मभूषण रामोजी राव यांच्या निधनानं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यांनी घडविलेली पत्रकारांची पुढची पिढी त्यांचा वैचारिक वारसा समर्थपणे पुढं नेईल. त्यांच्या संकल्पनेतील माध्यमविश्वाची शक्ती बळकट होईल. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. रामोजी राव यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलंय.
'हे' वाचलंत का :
- रामोजी राव यांनी माध्यम क्षेत्रात कशी क्रांती घडविली? वर्तमानपत्र ते डिजीटल माध्यमांमध्ये उमटविला अमीट ठसा - Ramoji Rao news
- रामोजी राव खऱ्या अर्थानं भारतरत्न, सर्वोच्च उपाधी प्रदान करणे हीच त्यांना श्रद्धांजली - एस. एस. राजमौली - ramoji rao passed away
- रामोजी राव खऱ्या अर्थानं भारतरत्न, सर्वोच्च उपाधी प्रदान करणे हीच त्यांना श्रद्धांजली - एस. एस. राजमौली - ramoji rao passed away