नाशिक Ramgiri Maharaj Controversy : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी बांगलादेशातील हिंदूंवर आत्याचार होत असल्याच्या मुद्द्यांवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिक परिसरात मोठी खळबळ उडाली. यावेळी शहरात आंदोलन करताना जमाव हिंसक झाला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
पोलिसांचं आवाहन : "जुने नाशिक भद्रकाली परिसरात पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात आहे. एसआरपीएफच्या तुकड्यांनाही पाचारण केले आहे. परिस्थिती आता नियंत्रणात असून, दोन्ही गटातील 15 जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सखोल तपासाचे आदेश देण्यात आले असून, नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये," असं आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले.
चौकशीचे दिले आदेश :नाशिकमधील दंगलीची गंभीर दखल घेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहेत. सिन्नर येथील कार्यक्रमानंतर रामगिरी महाराजांनी नाशिकमध्ये धाव घेत अपोलो रुग्णालयात जखमींची भेट घेतली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या समवेत बैठक घेतली. नाशिकमधील परिस्थिती नियंत्रणात असून, खबरदारी म्हणून पोलिसांचा वाढीव बंदोबस्त मागवण्यात आल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.
काय घडलं नेमकं? : एका समाजाकडून शुक्रवारी नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी सर्व परिसरातील दुकानं बंद करण्यात आली होती. शहरातील विविध भागातून रॅली काढून बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं जात होतं, यापैकी एक रॅली दुपारी एक वाजेच्या सुमारास भद्रकालीतील दूध बाजारात पोहोचली. त्यावेळी एका गटाकडून घोषणाबाजी सुरू असताना दुसरा गटही तेथे पोहोचला. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला व वाहनांची तोडफोड केली. यावेळी जमावाकडून केलेल्या दगडफेकीत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी यांच्यासह आठ पोलीस जखमी झाले. तसेच पाच नागरिकही जखमी झालेत.
आंदोलनानंतर जमाव हिंसक : महंत रामगिरी महाराज यांनी बांगलादेशावरुन केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मोठा गदारोळ उडाला. महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरुन नाशिक शहरात मोठा गदारोळ केला. महंत रामगिरी महाराज यांनी वक्तव्य केल्यानंतर नाशिक शहरातील संतप्त जमावानं आंदोलन केलं. यावेळी जमावानं आंदोलन केल्यानंतर शहरात मार्च करण्यात आला. यावेळी हिंसक झालेल्या जमावानं तोडफोड केली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव : रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एक समुदाय शुक्रवारी शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. रितसर कारवाई करतो, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. शुक्रवारी सकाळपासूनच सिटी चौक परिसरामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत होतं. पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक या जुन्या शहरातील बाजार पेठांवर परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
हेही वाचा :
- बोललो त्यावर ठाम, परिणामाची चिंता नाही; महंत रामगिरी महाराजांनी ठणकावलं - Mahant Ramgiri Maharaj Statement
- आम्ही संपलो नाही, अवामी लीग पुन्हा उभारी घेईल; शेख हसीना यांच्या मुलाचा 'एल्गार' - Sheikh Hasina Son