मुंबई Vijay Wadettiwar : ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात खळबळ उडाली आहे. सूत्रांनुसार, अशोक चव्हाण आजच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील. त्यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबईत पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.
काँग्रेसची तातडीची बैठक : गेल्या काही दिवसात महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नेते मिलिंद देवरा तसेच बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला रामराम केला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. अशोक चव्हाण यांचं जाणं काँग्रेससाठी मोठा धक्का मानलं जातंय. तसेच त्यांच्याबरोबर पक्षाचे 10-12 आमदारही सोडून जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी कॉंग्रेसनं ही तातडीची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आज दुपारी दोन वाजता कुलाब्यातील गांधी भवन (तन्ना हाऊस) येथे ही बैठक होईल.