मुंबईRamdas Athawale met Fadnavis :लोकसभेच्या जागा वाटपाबाबत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आग्रह धरला होता. आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा करत, तो आपणाला मिळावा यासाठी राजकीय दबाव तंत्राचा अवलंब सुरू केला. मात्र, आज रामदास आठवलेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा दावा सोडला आहे. फडणवीस यांनी आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचं आश्वासन दिल्यामुळं आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा दावा सोडत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस प्रचंड हुशार राजकारणी असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आम्हाला शिर्डीची जागा हवी होती :लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघ आपल्याला सोडण्यात यावा, अशी भूमिका रामदास आठवले यांनी घेतली होती. अनेक प्रयत्न केल्यानंतर याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर आज त्यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी मुंबईत भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, महायुतीत एकनाथ शिंदे, अजित पवार हे दोन पक्ष एकत्र आल्यामुळं आम्हाला अडचण झाली. आम्हाला शिर्डीची जागा हवी होती. हा मतदारसंघ आम्हाला मिळाला असता. परंतु शिर्डीच्या जागेपेक्षाही महाराष्ट्रात आम्हाला 45 जागा निवडून आणायच्या आहेत. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देऊन एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले. शरद पवारांना मोठा धक्का देऊन अजित पवार आमच्यासोबत आले म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या दोघांमुळे आमचा फायदाच झाला आहे. अशात पुढच्यावेळी आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद दिल्यास आमच्या समाजाला आनंद होणार असल्याची प्रतिक्रिया आठवले यांनी दिली आहे.
बहुजन समाजाला सन्मान मिळावा :यावेळीदेवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, पूर्वी घडलेल्या गोष्टी विसरून आपल्याला पुढं जायचं आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांनी एकत्र येत संपूर्ण देश जिंकायचा आहे. त्यासाठी तुमची ताकद आमच्यासोबत राहणं गरजेचं आहे. तुमच्या ताकदीवरच आम्ही निवडून आलो आहोत, असंही ते म्हणाले. कॅबिनेट मंत्रीपदाचं आश्वासन फडणवीस यांनी दिलं आहे. म्हणून आमची नाराजी आता दूर झाली आहे. बहुजन समाजाला सन्मान मिळावं हीच आमची अपेक्षा आहे. दिलेला शब्द ते पाळतील असा आम्हाला विश्वास आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.