पालघर Ramdas Athawale claims -महायुतीवर संविधान बुडवायला निघाल्याचा आरोप करणारे आणि संविधान वाचवण्याची मोहीम काढणारे अमेरिकेत गेल्यानंतर मात्र आरक्षण रद्द करण्याची भूमिका घेतात. त्यांचा खरा चेहरा आता समोर आल्यानं विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला त्याचा फटका बसणारा आहे. महायुतीला १५० ते १६० जागा मिळतील, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त डहाणू येथे दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचे लाभार्थी व अन्य घटकांशी आठवले यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी देशात आतापर्यंत पंतप्रधानात मोदी हे एकमेव पंतप्रधान असे आहेत, ज्यांनी संविधानावर माथा टेकवून शपथ घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत केलेल्या तरतुदींचा विचार करता आरक्षण कोणालाही काढता येणार नाही, हेच मोदी यांनी सांगितलं. त्यांच्या काळात देशातील पायाभूत सुविधांचा मोठ्या गतीने विकास झाला, असा गौरव आठवले यांनी केला. या वेळी त्यांनी चारोळ्या सादर केल्या.
चुकीच्या प्रचारामुळे लोकसभेत नुकसान - पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, की लोकसभेच्या निवडणुकीत दलित आदिवासी आणि मुस्लिमांमध्ये चुकीचा प्रचार केल्यामुळे महायुतीला फटका बसला. परंतु राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची आरक्षण नीती लक्षात आलीय. आता त्याचा फायदा महायुतीला होणार आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही, असे सांगताना विधानसभेतही त्यांच्यामुळे फायदाच होईल, असा दावा आठवले यांनी केला.
विधानसभेला हव्यात १२ जागा - राज्यात महायुती सत्तेत आल्यानंतर भारतीय रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात काही जागा देण्याची आणि दोन महामंडळांचे अध्यक्षपद तसेच महामंडळाच्या काही जागा आणि जिल्हास्तरीय शासकीय समित्यांत रिपब्लिकन कार्यकर्त्यांना संधी देण्याचे ठरले होते; परंतु अजितदादा आल्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाली आणि आमची संधी मात्र हुकली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्याच वेळी आता महामंडळाचा विस्तार होत असल्याने आणि महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर होत असल्याने रिपब्लिकन पक्षाला ठरल्यानुसार महामंडळे मिळावीत, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या बारा जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात आणि राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी ही आठवले यांनी केली.
मराठा समाजातील गरीबांना आरक्षण देण्याची मागणी- मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी चुकीची नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वप्रथम आम्हीच लावून धरला होता, असे निदर्शनास आणून आठवले म्हणाले, की देशभरातील क्षत्रिय समाजाला आरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव विविध राज्यांनी आमच्याकडे पाठवला, तर त्यावर आमचे मंत्रालय निश्चित विचार करील. महाराष्ट्रातून मराठा, गुजरातमधून पाटीदार, हरियाणामधून जाट, राजस्थानमधून राजपूत अशा विविध क्षत्रिय जातीसमूहाचा आरक्षणात समावेश आग्रह आहे. याबाबत देश पातळीवर निर्णय घ्यावा लागेल. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत तामिळनाडू सरकारच्या आरक्षणाचा अभ्यास करावा. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे शक्य नाही. त्यामुळे आठ लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी आठवले यांनी केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ओबीसीचा विरोध आहे. त्यामुळे हा प्रश्न जटील होईल. ओबीसीतून आरक्षण देण्याऐवजी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी सूचना आठवले यांनी केली.