ठाणेTHANE CRIME :देशभरात शंभरहून अधिक घरफोड्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीनं चोरीच्या पैश्यातून प्रशस्त बंगला बांधल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी आज एका ढाब्यावर जेवण करत असतानाच सापळा रचून त्याला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
आरोपीच्या मागावर सहा राज्याचे पोलीस : खळबळजनक बाब म्हणजे अटक करण्यात आलेला गुन्हेगार गुजरात पोलिसांच्या तावडीतून निसटला होता. रामविलास गुप्ता असं या सराईत गुन्हेगाराचं नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेश राज्यातील रहिवाशी आहेत. या आरोपीचा सहा राज्यातील पोलीस शोध घेत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
देशभरात विविध ठिकाणी गुन्हे :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल राेजी गुजरात पोलीसांचं पथक आरोपी रामविलास गुप्ताला एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ठाण्यात घेऊन आलं होतं. त्यावेळी आरोपीनं गुजरात पोलिसांना गुंगारा देत पळ काढला होता. दुसरीकडं रामविलास गुप्ता हा कुख्यात चोरटा असून त्यानं देशभरात शंभरहून अधिक घरफोडीचे गुन्हे केल्याचं तपासात समोर आलं आहे. रामविलासच्यावर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, दिल्ली आंध्र प्रदेश राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो शंभरहून अधिक गुन्ह्यात फरार होता. एवढा मोठा सराईत चोरटा गुजरात पोलिसांच्या तावडीतून निसटल्यानं त्याच्या शोधात अनेक पोलीस पथके काम करत होती.
आरोपीला पोलिसांनी घेरलं :आरोपीची माहिती मिळताच पोलिसांनी कल्याणनजीक म्हारळ परिसरातील असलेल्या एका ढाब्यावर रामविलास गुप्ताला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे रामविलास जेवणाची ऑर्डर देऊन एकाच्या प्रतिक्षेत तिथं बसला होता. त्यामुळं रामविलास परत पसार होऊ नये, यासाठी पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी त्याला घेरलं. पोलीस कर्मचारी सुशील हांडे, सचिन कदम अन्य सात पोलिसांनी रामविलासवर झडप घालून त्याला ताब्यात घेतलं.