मुंबई Rajya Sabha Bypoll Election 2024 :महाराष्ट्रातून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांपैकी एका जागेवर भाजपानं धैर्यशील पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरी जागा ही भाजपानं महायुतीमध्ये सामील झालेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोडली आहे. धैर्यशील पाटील यांच्याकडं दक्षिण रायगड जिल्ह्याची जबाबदारी असून ते भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत. धैर्यशील पाटील यांच्या उमेदवारीनं भाजपानं कोकण तसेच मुंबईवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकण तसेच मुंबईवर लक्ष :महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी रिक्त झालेल्या दोन जागांपैकी एका जागेवर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं भाजपाचे धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. धैर्यशील पाटील हे शेतकरी कामगार पक्षामधून भाजपामध्ये दाखल झाले आहेत. यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा दाखवली होती. परंतु महायुतीमध्ये रायगडची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे त्यांनी पक्षादेश मानत माघार घेतली. या जागेवरून अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. रायगड जिल्ह्यात धैर्यशील पाटील यांना मोठा जनाधार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षानं कोकण तसेच मुंबईवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला असून त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.