नवी दिल्ली :Rajya Sabha Election 2024 : राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून 6 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. त्या सर्व 6 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आज मंगळवार (दि. 20 फेब्रुवारी) रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत या 6 जागांवर नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. परंतु, या कालावधीत कुणी नामांकन मागं घेतलं नाही. त्यामुळे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
राजस्थानमधून सोनिया गांधी बिनविरोध : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राजस्थानातून राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. तसंच, भाजपाचे चुन्नीलाल गरासिया आणि मदन राठोड यांचीही राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. नामांकन मागं घेण्याच्या शेवटच्या दिवशी कुठलेही नवं नामांकन आलं नाही. त्यामुळे या तीनही नेत्यांची राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली. महत्वाचं म्हणजे, सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत.
- गुजरातमधून हे उमेदवार राज्यसभेवर :गुजरातमध्ये राज्यसभेच्या 4 जागा रिक्त होत्या. या जागांवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गोविंद ढोलकिया, जशवंत सिंग परमार आणि मयंक नायक गुजरातमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. विधानसभेत मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे गुजरातमधील भाजपाचे चार नेते राज्यसभेत पोहोचले आहेत.
बिहारमधून 6 उमेदवार : बिहारमधील सर्व 6 उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यसभेसाठी बिहारमधून भाजपाचे 2, आरजेडीचे 2, जेडीयू 1 आणि काँग्रेसचा १ उमेदवार रिंगणात होता. या सर्वांची राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. भीम सिंह आणि धरमशीला गुप्ता यांनी भाजपाकडून तर संजय झा यांना जेडीयूकडून उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आणि तेजस्वी यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे राजकीय सल्लागार संजय यादव, काँग्रेसचे अखिलेश प्रसाद सिंह यांच्याशिवाय उमेदवारी दाखल केली होती. सर्व 6 उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत.
मध्य प्रदेशातून 5 उमेदवार :राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातील पाचही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपाचे चार आणि काँग्रेसचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून आला आहे. भाजपानं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, उमेश नाथ महाराज, माया नरोलिया आणि बनशीलाल गुर्जर हे चार उमेदवार उभे केले होते. त्याचवेळी काँग्रेसने अशोक सिंह यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली होती. पाचपैकी एकाही उमेदवाराने नाव मागे घेतले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
या नेत्यांची महाराष्ट्रातून बिनविरोध निवड :
भाजप
- अशोक चव्हाण
- मेधा कुलकर्णी
- डॉ. अजीत गोपछडे