मुंबई Raj Thackeray : भारतीय हवामान विभागानं (Weather Department) उष्णतेची लाट (Heat Wave in Maharashtra) येण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह कोकणात पारा वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत पुन्हा तापमानात वाढ होणार आहे. पुढच्या चार दिवसांच्या कालावधीत मराठवाड्याच्या कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. या दरम्यान तापमान निर्देशांक 40 ते 50 अंशांच्या दरम्यान असू शकतो, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली.
राज ठाकरेंचा हवामान विभागाला सवाल :जवळपास सर्वच नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या हवामान बदलाची नोंद घेतली. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी 'उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं आधीच का नोंदवली नाही?' असा प्रश्न उपस्थित केला. आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, "गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास 40 अंशांपर्यंत गेलंय. अर्थात उर्वरित महाराष्ट्रातपण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो."
शाळांना सुट्टी जाहीर करा : राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की, "अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू व्हायला अजून काही काळ असल्यामुळं त्यांना शाळेत जावं लागत आहे. याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारनं शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी. तसंच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल."