मुंबई Vishalgad Encroachment:विशाळगड किल्ला (Vishalgad) जवळील गजापूर परिसरात 14 जुलै रोजी झालेल्या हिंसाचार आणि तोडफोड करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यामध्ये त्यावेळी पडत असलेला मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानता यामुळं अडथळा निर्माण झाल्याचा दावा, कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) केला. विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या आणि तोडफोडीच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी पोलिसातर्फे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली. यामुळं वेळेत कारवाई करणं शक्य झालं नसल्याचं पोलिसातर्फे सांगण्यात आलं. एवढ्या नाजूक परिस्थितीतही पोलिसानी त्यांचे कर्तव्य चांगल्याप्रकारे बजावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा स्वतः पोलिसांनीच प्रतिज्ञापत्रातून केलाय.
उच्च न्यायालयात याचिका दाखल :राज्यातर्फे ॲड. जनरल डॉ. बीरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. तर ज्येष्ठ वकील ॲड. सतीश तळेकर, ॲड. माधवी अय्यपन यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. अयुब कागडी आणि इतरांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करुन रहिवासी यांचे बांधकाम तोडण्यात आले का? याबाबत माहिती सादर करावी असे निर्देश न्यायालयाने यावेळी दिले. तर विशाळगड येथील कोणतेही रहिवासी यांचे बांधकाम तोडण्यात आले नाही, अशी माहिती डॉ. सराफ यांनी राज्यातर्फे दिली. तर, केवळ व्यावसायिक बांधकाम तोडण्यात आल्याची माहिती पुरातत्व खात्याचे उपसंचालक हेमंत दळवी यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे.