नंदुरबार : "संविधान ज्यांनी वाचलं नाही, त्यांना ते कोरंच दिसेल. संविधानाची पायमल्ली करणारेच संविधान कोरं असल्याची टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान वाचलं नाही, त्यांनी फक्त संविधानाचा रंग पाहिला. मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीत संविधानाचं रक्षण करु," असं वक्तव्य विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नंदुरबार इथं केलं. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना 3 हजार रुपये दरमहिना देऊ, महिलांना मोफत एस टी बससेवा देऊन शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करु, अशी आश्वासनंही यावेळी राहुल गांधी यांनी यावेळी दिली.
महालक्ष्मी योजनेतून महिलांना देणार 3 लाख रुपये :महायुती सरकारनं महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये मदत सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांनी महायुतीवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. मात्र आज नंदुरबार इथल्या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी "महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास महिलांसाठी महाल्क्षमी योजना सुरू करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहिन्याला 3 हजार रुपये मदत देण्यात येईल, त्यासह महिलांना एस टी बसचा प्रवास मोफत करण्यात येईल. शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्यात येईल," अशी आश्वासनं राहुल गांधी यांनी दिली.