मुंबई INDIA Alliance Rally Mumbai : निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुका जाहीर केल्यानंतर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी मुंबईत समारोप झाला. 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध शिवाजी पार्कमधून निवडणूक प्रचाराची सुरुवात केलीय. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेला इंडिया आघाडीतील महत्वाचे नेते उपस्थित होते. या सभेतून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.
दिग्गज नेत्यांची हजेरी : महासभेसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला, AAP नेते सौरभ भारद्वाज, दीपंकर भट्टाचार्य यांच्यासह 15 इंडिया आघाडीचे 40 हून अधिक प्रमुख नेते सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इंडिया आघाडीची पहिली सभा मुंबईत झाली.
'अब की बार भाजपा तडीपार' :"भाजपा देशात नुसता फुगा आहे. या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं. ती हवा आता त्यांच्या डोक्यात गेलीय. आम्ही हुकूमशाहीविरोधात आहोत. मोदी तुमच्या परिवारात फक्त तुमची खूर्ची आणि सत्ता एवढंच आहे," अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर केलीय. "न्यायालयात शपथ घेताना धर्माच्या ग्रंथावर शपथ न घेता घटनेवर घ्यायला हवी," असं देखील ठाकरे म्हणाले. देश आपलाच धर्म आहे. देश वाचला तर आपण वाचू, कोणी कितीही मोठा असला तरी, देश मोठा असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे. देशात एक मजूबत सरकार असायला हवं होतं, असं वाटत होतं. मात्र, 2014 पासून देशात एकाच पक्षाचं सरकार आहे. देशात जेव्हा जनता एकवटते तेव्हा, हुकूमशाहच्या छाताडावर बसून रणशिंग फुकायचं. देशाची जनता माझ्या सोबत आहे. तुम्हाला तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. 'अब की बार भाजपा तडीपार', अशी टीका ठाकरेंनी मोदी सरकारवर केलीय.
देशात परिस्थिती बदलण्याची गरज :"देशात परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. मोदींची चुकीची गॅरंटी आहे. तसंच आपल्याला दबाब तंत्राविरोधात लढावं लागणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.