महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

91 वर्षीय आजोबांनी घरबसल्या बजावला मतदानाचा हक्क, कुटुंबीयांनी मानले निवडणूक आयोगाचे आभार - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात राधाकिसन शेवाळे (वय 91) यांनी प्रथमच घरून मतदान करण्याचा हक्क बजावला आहे. निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच वृद्ध व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानं शेवाळे यांनी आयोगाचे अभार मानले आहेत.

Voting from home
राधाकिसन शेवाळे (Reporter ETV Bharat Maharashtra Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 4:46 PM IST

राधाकिसन शेवाळे यांच्या मुलाची प्रतिक्रिया (Reporter ETV Bharat Maharashtra Desk)

छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Election 2024: औरंगाबाद लोकसभा मतदार संघात 13 मे रोजी निवडणूक पार पडणार आहे. त्यापूर्वी वृध्द तसंच दिव्यांग व्यक्तीच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. शहरात राहणाऱ्या 91 वर्षीय राधाकिसन शेवाळे यांनी त्यांच्याघरी मतदानाचा हक्क बजावला आहे. स्वतंत्र भारतात सर्व पद्धतीचे मतदान करण्याचा अनुभव त्यांनी अनुभवला. निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच वृध्द व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत येणे शक्य नसल्यामुळं घरी बसून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलीय. या प्रक्रियेत पुढील चार दिवसात 700 जण या सुविधेचा फायदा घेणार आहेत.

वाढदिवसाच्या दिवशी घर बसून मतदान :निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच घर बसल्या मतदान मतदान करण्याची सुविधा दिली. शहरात मोती कारंजा येथे राहणाऱ्या 91 वर्षीय राधाकिसन हिरामण शेवाळे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पहिलं मतदान करण्याचा मान मिळवलाय. शेवाळे त्यांचा जन्म जन्म 8 मे 1933 रोजी औरंगाबादेत झाला. ते मराठा हायस्कूल येथे कर्मचारी होते, तर वडिलांचा खानावळ व्यवसाय देखील होता. वडीलांनंतर त्यांनी आपला व्यवसाय सांभाळला. वाढदिवस साजरा करताना घरबसल्या मतदान करण्याच्या नवीन सुविधेचा मान त्यांना मिळाल्यानं कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. मतदान प्रक्रिया पूर्ण करत असताना त्यांच्या वयोमानामुळं काही गोष्टी सांगताना अडचणी आल्या. ऐकू कमी येत असल्यानं निवडणूक अधिकारी देत, असलेल्या सूचना कुटुंबीयांनी रोजच्या सवयीनुसार त्यांना सांगितल्या. प्रक्रिया समजून आल्यावर आजोबांनी आपलं मतदान गुप्तपणे केलं. त्यानंतर कुटुंबीयांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यामुळं आजोबांसह कुटुंबीयांनी आनंद साजरा केलाय.

कुटुंबीयांनी मानले निवडणूक आयोगाचे आभार :पहिल्यांदाच निवडणूक आयोगानं हा उपक्रम राबवला आहे. त्यात आमच्या वडिलांना मतदान करता आलं, हे आमचे सौभाग्य आहे. वयस्कर व्यक्तींना मतदानासाठी घेऊन जाणे अवघड असतं. विशेषतः त्यांना पायी चालता येत नाही, उन्हाचा त्रास होतो, अशा परिस्थितीत मतदान करणं शक्य होत नाही. वडिलांना असणारा त्रास पाहता यावेळी त्यांना मतदानाला घेऊन जावं की नाही, असा प्रश्न पडला होता. मात्र, शासनानं घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळं वयस्कर लोकांना आपला हक्क बजावणं शक्य झालंय. त्यामुळं निवडणूक आयोगाचे आभार मानतो, अस मत राधाकिशन शेवाळे यांचे पुत्र किशोर शेवाळे यांनी व्यक्त केलं.


पहिल्या दिवशी 331 जणांचं घरी बसल्या मतदान :लोकसभा मतदारसंघात दिव्यांग, वयोवृद्धांच्या मतदानाला घर बसल्या मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल 331 जणांच्या घरी जाऊन बीएलओ यांनी मतदान प्रक्रिया पार पाडली. ही प्रक्रिया 10 मे पर्यंत राबविली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीअंतर्गत मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना घर बसल्या मतदानाची सुविधा देण्यात येत आहे. या लोकसभेसाठी प्रथमच 85 वयापेक्षा जास्त तसंच दिव्यांग व्यक्तींचं मतदान घर बसल्या घेतलं जात आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात गृह मतदानासाठी 700 जण पात्र ठरले आहेत. यामध्ये 575 वयोवृद्ध तर 125 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. घर बसल्या मतदानासाठी एकूण 35 पथके तैनात करण्यात आली आहे. त्यात केंद्रस्तरीय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, व्हिडिओग्राफर, पोलीस आदींचा समावेश आहे.

हे वाचलंत का :

  1. शरद पवारांनी फेकला नवा राजकीय बॉम्ब, उद्धव ठाकरेंची होणार का अडचण? - Sharad Pawar
  2. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरच्या वादाचा पवार कुटुंबावर परिणाम, बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काय वाद झाला? - Baramati lok Sabha election 2024
  3. "शरद पवार आणि राजनाथ सिंह यांचं सेटलमेंट...", प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, राजकीय वाद पेटणार? - Prakash Ambedkar

ABOUT THE AUTHOR

...view details