महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं ७६ व्या वर्षी निधन - Meenakshi Patil passes away - MEENAKSHI PATIL PASSES AWAY

माजी राज्यमंत्री आणि शेकापच्या नेत्या मीनाक्षीताई पाटील यांचे 76 व्या वर्षी निधन झाले. गेली काही दिवस त्या आजारी होत्या.

Meenakshi Patil  passes away
Meenakshi Patil passes away

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 11:04 AM IST

Updated : Mar 29, 2024, 12:14 PM IST

अलिबाग (रायगड) - शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी (29 मार्च ) निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या त्या तीन वेळा आमदार होत्या. 1999 मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.

शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत्या. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. मीनाक्षी पाटील यांनी अलिबाग विधानसभा मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले होते. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यादेखील त्या दीर्घकाळ अध्यक्षा होत्या. त्याच्या निधनानं रायगडात शोककळा पसरली आहे. मीनाक्षी पाटील यांच्या निधनानं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक प्रकट केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली-मीनाक्षी पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी एक्स मीडियात म्हटले, " मीनाक्षी पाटील यांनी आपल्या कर्तृत्वानं ,दातृत्वानं आणि ममत्वानं त्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यात ठसा उमटवला. मीनाक्षी ताई यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत एक जिव्हाळ्याचे नाते आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर मीनाक्षी ताई यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली."

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली-शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातला एक संघर्षशील अध्याय संपला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन लढणारं, विधिमंडळात जोरदार आवाज उठवणारं निर्भिड नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. मीनाक्षीताई पाटील यांचं संपूर्ण कुटुंबंच शेतकरी कामगार पक्षाशी जोडलं गेलं आहे. लहानपणापासूनच त्यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे संस्कार झाले. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन मोर्चे, आंदोलनं केली. त्यांचं जीवन दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या कल्याणासाठी समर्पित होतं. परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांचा संपूर्ण रायगड जिल्ह्यात दरारा होता. कार्यकर्त्यांचा आधार असणाऱ्या मीनाक्षीताईंच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पाटील कुटुंबियांच्या तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी पोस्ट उपमुख्यमंत्री पवार यांनी एक्स मीडियावर केली आहे.

Last Updated : Mar 29, 2024, 12:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details