महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ससून'चा आणखी एक कारनामा उघड; बेवारस रुग्णाला निर्जनस्थळी दिलं सोडून, डॉक्टर निलंबित - Sassoon Hospital Pune - SASSOON HOSPITAL PUNE

Sassoon Hospital Pune : पुणे शहरातील ससून हॉस्पिटलमधील अनेक प्रकरणं समोर येत आहेत. आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळेस निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी डॉक्टर आदी कुमार (Adi Kumar) यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती, अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिली.

Sassoon Hospital Pune
ससून रुग्णालय पुणे (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 6:44 PM IST

Updated : Jul 23, 2024, 10:17 PM IST

पुणे Sassoon Hospital Pune :पुण्याच्या ससून हॉस्पिटलचा भोंगळ कारभार पुन्हा उघडकीस आला. ससून हॉस्पिटलचे डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळेस निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी हा प्रकार समोर आणला. तसेच याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, डॉक्टर आदी कुमार (Adi Kumar) यांना निलंबन करण्यात आलं.

ससूनच्या डॉक्टरानं रुग्णाला निर्जनस्थळी नेऊन टाकलं (ETV BHARAT Reporter)

काय आहे नेमकी घटना? : शहरातील बेवारस रुग्णांची दादासाहेब गायकवाड हे सेवा करतात. रस्त्यावर बेवारस स्थितीत आजारी असलेल्या व्यक्तींना ते उपचारांसाठी ससूनमध्ये दाखल करतात. 16 जून रोजी त्यांनी मध्यप्रदेश येथील निलेश नावाच्या 32 वर्षाच्या रुग्णाला ससूनमध्ये ॲडमिट केलं होतं. याआधीही बेवारस रुग्ण गायब झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यामुळं हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी रितेश गायकवाड यांच्यासोबत ससूनच्या बाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली होती.

रुग्णाला सोडलं निर्जनस्थळी : सोमवारी पहाटे दीड वाजता सामाजिक कार्यकर्ते रितेश गायकवाड हे रिक्षा घेऊन ससून हॉस्पिटलच्या बाहेर उभे होते. हॉस्पिटलचे डॉ.आदी कुमार आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने निलेश नावाच्या बेवारस रुग्णाला सोडून यायचं आहे, येणार का? अशी चौकशी केली होती. काही वेळाने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नवीन बिल्डिंगमधला दोन्ही पाय नसलेला आणि हातात सलाईनची सुई व विविध ठिकाणी जखम झालेला एक रुग्ण कर्मचाऱ्यांनी रिक्षात ठेवला. त्या रुग्णाला घेऊन डॉक्टर आणि त्यांचे सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाखाली अंधारात रुग्णाला सोडून निघून गेले. काही वेळाने पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते गायकवाड यांनी त्या रुग्णाला पुन्हा ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केलं. तसेच येरवडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.

गेल्या काही दिवसांपासून ससून हॉस्पिटलमधील बेवारस रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. सोबतच त्यांना उपचार देण्याऐवजी स्वतः डॉक्टर हे बाहेर सोडून देत आहेत. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. याबाबत चौकशी करावी म्हणजे पुढे असे प्रकार घडणार नाहीत. हा प्रकार अतिशय गंभीर असून वैद्यकीय सेवेला काळीमा फासणारा आहे. गरीब आणि बेवारस रुग्णांना न्याय मिळणार कसा? याची चौकशी करून डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. तसेच आतापर्यंत असे किती रुग्णांना बाहेर सोडले याची चौकशी करणं गरजेचं आहे. - रितेश आणि दादासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते

ससून हॉस्पिटलमधील जो काही प्रकार घडला आहे, तो खूपच दुर्दैवी आहे. जोपर्यंत त्या डॉक्टरांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. - रविंद्र धंगेकर, आमदार, काँग्रेस

'ससून' नेहमी चर्चेत : पुण्यातील ससून हॉस्पिटल हे मागील काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत आहे. सुरुवातीला ललित पाटील ड्रग प्रकरणावरुन ससून चर्चेत राहिले. त्यानंतर लगेच कल्याणीनगर येथील पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड बदलल्याप्रकरणी ससून हॉस्पिटल चर्चेत आले. आता तर चक्क बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून दिल्याचा प्रकार ससूनमध्ये उघडकीस आला.

हेही वाचा -

  1. Sassoon Hospital Pune: ससूनमध्ये बाहेरुन औषधे आणण्याची चिठ्ठी दिल्यास डॉक्टरांवर होणार कारवाई
  2. ससूनचा पदभार स्वीकारताच डॉ चंद्रकांत म्हस्के 'ॲक्शन मोडवर'; म्हणाले... - pune hit and run case
  3. ससून रुग्णालय पुन्हा चर्चेत : चार दिवसांपूर्वी आलेल्या वैद्यकीय अधीक्षकाची बदली करा, अधिष्ठाताच्या पत्रानं खळबळ - Sasoon Dean Letter
Last Updated : Jul 23, 2024, 10:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details