मुंबई - सुपरस्टार सलमान खानची त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटातील झलक पाहण्यासाठी चाहते आयुर झाले आहेत. त्यांचे प्रतीक्षा अखेर संपली आहे. बॉलिवूडच्या भाईजानचा बहुप्रतीक्षित सिकंदर चित्रपटाचा टीझर आज २८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिकंदरचा टीझर 27 डिसेंबरला सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित होणार होता, मात्र देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळं सलमान खानच्या चाहत्यांची प्रतीक्षा एक दिवस लांबणीवर पडली होती. आज 28 डिसेंबरला 'सिकंदर'चा टीझर चाहत्यांना पाहता येणार आहे.
सलमान खानचा आगामी 'सिकंदर' या मास अॅक्शन चित्रपटाचा टीझर खूपच रोमांचक असणार आहे. सुमारे 1 मिनिटाचा 'सिकंदर'चा टीझर सलमान खानच्या अॅक्शन आणि सस्पेन्सने भरलेला असेल. सलमान खान सध्या 'सिकंदर'च्या शूटिंगमध्ये खूप बिझी आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात येणार आहे. हा टीझर आज सकाळी 11.07 वाजता रिलीज होणार होता, पण आता तो आज 28 डिसेंबरला संध्याकाळी 4.05 वाजता रिलीज होणार आहे.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
'सिकंदर' या चित्रपटाची रिलीज डेट आधीच लॉक करण्यात आली आहे. 'सिकंदर' हा चित्रपट २०२५ च्या ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 'सिकंदर' ईदला म्हणजेच मार्च 2025 ला थिएटरमध्ये येण्यासाठी सज्ज आहे. आमिर खानबरोबर 'गजनी' हा चित्रपट करणारे साऊथचे दिग्दर्शक एआर मुरुगादास यांनी 'सिकंदर'चं दिग्दर्शन केलं आहे. 'सिकंदर'चा निर्माता साजिद नाडियादवाला आहे, जो सलमान खानचा जवळचा मित्र आहे.
सलमान आणि साजिदने एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. 'सिकंदर' या चित्रपटात सलमान खानबरोबर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसणार आहे आणि काजल अग्रवाल देखील या चित्रपटात दिसणार आहे. आता 2025 च्या ईदच्या मुहूर्तावर सलमान खान त्याच्या चाहत्यांसाठी किती मोठा धमाका करणार हे पाहावे लागणार आहे.