पुणे Pune News : पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून एका 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तर याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न :मिळालेल्या माहितीनुसार, राजगड तालुक्यातील कोंढवळे गावात ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन दावा न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर पध्दतीनं ताबा घेण्यासाठी आलेल्या 25 ते 30 जणांनी जेसीबीच्या साहाय्यानं अंगावर माती टाकून जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा 22 वर्षीय तरुणीचा आणि तिच्या कुटुंबीयांचा आरोप होता. तरुणीनं आरोप केलाय की, पोलिसांसह काही जण जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले होते. तेव्हा तरुणी आणि त्यांच्यात झालेल्या वादा दरम्यान ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओत तरुणी कंबरेपर्यंत मातीमध्ये गाडली गेली असल्याचं दिसतय. तर याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केलाय.