पुणे- पुण्यातील अपघात प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून कठोर कारवाईची मागणी केल्यानंतर पुणे पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघात प्रकरणात संभाजीनगर घेण्यात आलेल्या पुण्यातील आरोपीला दुपारी पुण्यात आणलं जाणार आहे. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करत उद्या दुपारी त्याला पुणे न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे.
पुण्यातून पसार झाल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपी बिल्डरनं छत्रपती संभाजीनगर गाठल. तेथे दोन हॉटेलमध्ये खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. एका आलीशान हॉटेलमध्ये कार चालक आणि त्यांच्या मित्र राहात होता. तर, आरोपी स्वत: रेल्वे स्टेशनजवळच्या अगदी साध्या लॉजमध्ये राहात होता. मात्र, पोलिसांनी चौकसपणे माग काढत ताब्यात घेत अटक केली आहे.
साध्या लॉजमध्ये ठोकला होता मुक्काम-छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या नारळीबाग भागातील ‘जेपी इंटरनॅशनल’ या हॉटेलमध्ये तीन खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. आरोपीच्या मागावर असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना आरोपी हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, संभाजीनगर पोलिसांच्या मदतीनं याठिकाणी छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी चालक चतुर्भूज डोळस आणि आरोपीचा सहकारी राकेश पौडवाल हे दोघे मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तेव्हा विधीसंघर्षग्रस्त मुलाचा पिता हा दुसऱ्या हॉटेलमध्ये उतरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपीनं रेल्वे स्टेशनजवळच्या ‘जेएम प्लाझा अँड रेस्टॉरंट’ या अगदी साध्या लॉजमध्ये उतरला होता. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. या तिघांना घेऊन पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके पुण्याकडं रवाना झाली आहेत.
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकानं रविवारी पहाटे भरधाव वेगात आलिशान कार चालवून दोघांना कल्याणीनगरमध्ये उडविले. या अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर काही तासातच विधीसंघर्षग्रस्त बालकाला जामीन मिळाला. बाल न्याय मंडळानं विधीसंघर्षग्रस्त बालकाला "रस्ते अपघात आणि उपाय' यावर ३०० शब्दांचा निबंध लिहण्याची अट घालून जामीन दिला. तसचे त्याला दारूमुक्ती केंद्रात समुपदेशनासाठी पाठविण्याचे निर्देश दिले. दोघांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला जलदगतीनं जामिन मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.
सत्र न्यायालयात अपील दाखल करणार-पोलिसांनी विधीसंघर्षग्रस्त बालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाला प्रौढ म्हणून तपासण्याची परवानगी मिळावी, असा न्यायालयात अर्ज दाखल केला. तसेच त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्याची परवानगी न्यायालयाकडं मागितली. मात्र, न्यायालयानं याचिका फेटाळल्यानं सत्र न्यायालयात याचिका अपील करणार असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.
विशेष वकील नेमण्याचा प्रयत्न-पोलीस आयुक्त म्हणाले, "अल्पवयीन मुलानं मद्यप्राशन केल्यांच बारमधील सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं. मात्र, त्याच्या रक्ताच्या तपासणीचा अहवाल आलेला नाही. पोलिसांनी बारमालकाविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. या प्रकरणाचा तपास एसीपी दर्जाचा अधिकारी करणार आहे. तर न्यायालयात बाजू मांडण्याकरिता विशेष वकील नेमण्याचा प्रयत्न आहे."
सोसाट्यांमधून बार चालत असल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप- कल्याणनगरमधील स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, खूप दिवसांपासून या भागातील पब आणि बारमुळे त्रास होतो. त्यामुळे आम्ही त्याला विरोध करतो. दुसऱ्या एका महिलेनं सांगितलं, हा आमचा परिसर पूर्वी शांत होता. मात्र, गेल्या काही वर्षांत पब संस्कृती रुजल्यानंतर येथील शांतता संपली आहे. येथील पब आणि बार विरोधात आम्ही पुणे महानगरपालिका, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडं तक्रार करूनही काही फायदा झाला नाही. "आमचा परिसर शांत होता, पण गेल्या काही वर्षांत पब संस्कृती रुजली आहे. आता हा परिसर उद्ध्वस्त करत आहे,"असे एका महिलेनं सांगितलं. पुणे महानगरपालिका, पोलीस तसेच उत्पादन शुल्क विभागाकडे हा मुद्दा मांडण्यात आला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही, असेही महिलेनं सांगितलं. टीम स्वच्छ कल्याणी नगरच्या सदस्य (TSKN) यामिनी चरणिया यांनी सांगितलं की, "काही रेस्टोरंट हे निवासी सोसाट्यांमधून चालतात. तेथून मद्य दिलं जातं. बार आणि पब पहाटे तीन किंवा चार वाजेपर्यंत चालतात. नवीन पोलीस आयुक्तांनी हे बार आणि पब नियमानुसार वेळेत बंद करण्याची खात्री केली पाहिजे.
सोशल मीडियात नाराजी-अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी अपघातामधील मृतांची नावे आहेत. दोघेही आयटी प्रोफेशनल आणि मूळ मध्य प्रदेशमधील रहिवाशी होते. त्यांच्या मृत्यूनंतरही बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला जामिनवर सोडण्यात आल्यानं अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. तर काहीजणांना सोशल मीडियावर पोस्ट करत कायद्यातील त्रुटीबाबत संताप व्यक्त केला.
हेही वाचा-
- पुणे हिट अँड रन प्रकरणी हॉटेल मालक, मॅनेजर आणि वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल - Pune Hit And Run Case
- पुणे हिट अँड रन अपघात : 'त्या' अल्पवयीन आरोपीला न्यायालयानं 'या' अटींवर दिला जामीन - Pune Accident News