पुणे : "जिल्ह्यातील भोर येथील बौद्ध युवक विक्रम गायकवाडची झालेली हत्या ही आंतरजातीय विवाह केल्यामुळं करण्यात आली. सदर प्रकार हा ऑनर किलिंगचा असून त्या दृष्टीने योग्य तपास होवून सर्व संबंधितांना अटक व्हावी", अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे आणि रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केली. तसंच याच मुद्दावर मंगळवारी (18 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता भोर तहसील कार्यालयावर निषेध मूक मोर्चाचं आयोजन आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांच्या वतीनं करण्यात आल्याची माहिती, पत्रकार परिषदेद्वारे संबंधित नेत्यांनी दिली.
निषेध मूक मोर्चा काढणार: भोर येथे राहात असलेल्या विक्रम गायकवाड या तरुणानं त्याच्या लगतच्या गावातील सवर्ण समाजाच्या मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता. आंतरजातीय विवाह मुलीच्या घरच्यांना मान्य नसल्यानं विवाह मोडण्याचा प्रयत्न मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता. तसंच मुलीला आणि विक्रमला जीवे ठार मारण्याच्या धमक्या देखील दिल्या होत्या. विक्रमच्या कुटुंबीयांनी हत्या होण्याची शक्यता स्थानिक पोलिसांकडं व्यक्त केली होती. परंतु, त्याकडं पोलिसांनी दुर्लक्ष केलं आणि दुसऱ्याच दिवशी हत्या करण्यात आल्यानं या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. या घटनेला दहा दिवस लोटल्यानंतरसुद्धा पोलिसांचा तपास हा अत्यंत चुकीच्या दिशेने सुरू असल्याचं पोलीस उपाधीक्षक भोर यांच्याशी झालेल्या चर्चेतून शिष्टमंडळाला जाणवलं. त्यामुळं निषेध मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून या मोर्चात हजारो लोक सहभागी होणार आहेत अशी माहिती, परशुराम वाडेकर यांनी दिली.