छत्रपती संभाजीनगर : संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येबाबत राज्यात सामाजिक आणि राजकीय वातावरण तापत चाललं आहे. दोन्ही निंदनीय घटनांच्या विरोधात सकल मराठा समाजाच्यावतीनं संभाजीनगरमध्ये भव्य सर्वधर्मीय जनआक्रोश मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील क्रांती चौक येथून 19 जानेवारी रोजी हा मोर्चा निघणार आहे. मोर्चात बहुजन संघटनासह, इम्तियाज जल्लील उपस्थित राहणार आहेत.
19 तारखेला सर्वधर्मीय मोर्चाचं आयोजन: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी या युवकांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या घटनेतील सर्व आरोपीना लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या उद्देशानं येत्या 19 जानेवारी रोजी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी खासदार इम्तियाज जल्लील देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. शहरातील क्रांती चौक परिसरातून या मोर्चाला सुरुवात होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर समारोप होणार आहे. तर या मोर्चात सर्वांत पुढे बॅनर त्यानंतर विविध धर्मांचे प्रमुख त्यानंतर महिला आणि त्यानंतर पुरुष असा क्रम असणार आहे. तर या मोर्चासाठी देशमुख आणि सूर्यवंशी परिवाराला सुध्दा निमंत्रीत केलं जाणार आहे. सभेस संबोधन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मान्यवरच करणार असून या निषेध सभेच्या ठिकाणी भव्य स्टेज उभारले जाणार आहे. त्यावर विशिष्ट आसन व्यवस्था निर्माण केली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.