मुंबई/नंदुरबार/ छत्रपती संभाजीनगर : सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी बरेच प्रयत्न करत आहे. त्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकी एक म्हणजे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया (कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया). कुटुंब कल्याण कार्यक्रमादरम्यान ही शस्त्रक्रिया करण्यात येते. ही शस्त्रक्रिया महिला आणि पुरूष या दोघांवरही करता येते. मात्र, त्यात महिलांचाच पुढकार सर्वाधिक असून पुरुषांचं प्रमाण अनेक जिल्ह्यात नगण्य आहे. नसबंदीसाठी पुरुष तयार होत नसल्याचं चित्र राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यात आहे. त्यामुळं कुटुंब कल्याणाची जबाबदारी केवळ महिलांचीच आहे का?, असा प्रश्न निर्माण होत आहे.
दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया :कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत कायम आणि तात्पुरती पद्धती अशा दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. कायमच्या पद्धतीमध्ये स्त्री आणि पुरुष शस्त्रक्रियेचा समावेश आहे. स्त्री शस्त्रक्रियांमध्ये टाक्याचा आणि बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया करण्यात येते तर, तात्पुरत्या पद्धतीमध्ये तांबी, गर्भनिरोधक गोळ्या आदींचा वापर केला जातो. राष्ट्रीय कुटुंब कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य केंद्र, कुटुंब कल्याण केंद्रे, सहायक परिचारिका यांच्यामार्फत ग्रामीण भागामध्ये ही योजना राबविली जाते. वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोना प्रादुर्भावामुळं या कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रियांमध्ये मोठी घट झाली होती.
नसबंदी शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय? : नसबंदी शस्त्रक्रिया म्हणजे, पुरुषाच्या अंडकोषातून शुक्राणू वाहून नेणारी नळी कापून काढली जाते. पुरुषांसाठी ही सर्वात प्रभावी गर्भनिरोधक पद्धत आहे. शस्त्रक्रियेनंतर दोन-तीन महिने काळजी घ्यावी लागते. कारण वीर्यकोशात साठवलेले शुक्राणू पूर्णपणे बाहेर निघण्यास तेवढा वेळ लागतो. ज्यांनी नसबंदी केली आहे त्यांना इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) असलेली मुले होणे शक्य आहे. शुक्राणू सामान्य मार्गाने येत नसल्यामुळं, अंडकोषातून शुक्राणू घेऊन आयव्हीएफ पद्धतीने मूल होणं शक्य आहे.
नंदुरबारसारखा जिल्हा आघाडीवर का? :नंदुरबार जिल्हा पुरुष नसबंदी शस्त्रक्रीयेच्या बाबतीमध्ये आघाडीवर आहे. आदिवासीबहुल जिल्ह्यात हे प्रमाण जास्त का, याबाबत नंदुरबारमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दमनसिंह पाडवी म्हणाले की, "आता अत्याधुनिक पद्धतीनं पुरुष नसबंदीची शस्त्रक्रीया करण्यात येते. त्यात एक थेंबही रक्त येत नाही. सुरूवातीला थोड्या प्रमाणात शस्त्रक्रीया करत होते. कालांतराने ग्रामीण भागातील पुरुषांच्या मनातील गैरसमज दूर झाले आहे. त्यांच्या लक्षात आलं की, या नसबंदी शस्त्रक्रीयेमुळं शारिरीक संबंध ठेवताना कोणतीही अडचण येत नाही, तसेच कोणत्याही प्रकारचा अशक्तपणाही येत नाही. त्यानंतर त्यांनीच मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. हळूहळू सर्वांचा विश्वास संपादन करता आला. समाजात स्वीकारार्हता निर्माण झाली आहे, म्हणूनच नंदूरबार जिल्हा राज्यात आणि भारतात पुरुष नसबंदी शस्त्रक्रीयेत आघाडीवर राहिलेला आहे".
जबाबदारी महिलांचीच, ही मानसिकता आजही कायम: "छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ ६ पुरुषांनीच नसबंदी शस्त्रक्रीया केली आहे. यासंदर्भात अजुनही बऱ्याच गैरसम आहेत. कुटुंबनियोजन ही जबाबदारी महिलांचीच आहे, अशी ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही मानसिकता आजही आहे. मग, गोळ्या असो किंवा शस्त्रक्रीया असो, हे महिलांनीच करायचं अशी धारणा आहे. पुरुषांच्या नसबंदीबाबत अजुनही साशंकता समाजात आहे. नसबंदीनंतर पुरुषत्व जातं, अवघड कामे करु शकत नाही असा गैरसमज आहे. आम्ही जनजागृती करत असतो. मात्र, महिलाच त्यास विरोध करतात. पुरुष तयार होतात. मात्र महिला म्हणतात की, शस्त्रक्रीया आमची करा. अनेकदा पुरुष शस्त्रक्रीयेसाठी घाबरतात. उलट पुरुषांची शस्त्रक्रीया अतिशय सोपी आहे. काही मिनिटांमध्ये होते. फक्त काही दिवस काळजी घ्यावी लागते. ती कोणत्याही शस्त्रक्रीयेमध्ये घ्यावीच लागते", असं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर म्हणाले.
शस्त्रक्रिया करुन घेण्याचं प्रमाण किती? : कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. पुरुषांकडून ही शस्त्रस्त्रिया करुन घेण्याचं प्रमाण अतिशय नगण्य असं आहे. राज्यात एक लाख 58 हजार 380 जणांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामध्ये महिलांचे प्रमाण एक लाख 55 हजार 780 आहे तर पुरुषांचे प्रमाण अवघे 2600 इतके आहे.
जिल्ह्यांमध्ये काय आहे प्रमाण? : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एक लाख 24 हजार 819 जणांनी ही कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामध्ये महिलांचे प्रमाण एक लाख 22 हजार 527 आहे तर पुरुषांचे प्रमाण 2292 इतकेच आहे.
महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये कितीप्रमाण? :राज्यातील महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये 33 हजार 561 कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या त्यामध्ये महिलांचे प्रमाण 33 हजार 253 इतके आहे. तर, पुरुषांचे प्रमाण अवघे 308 इतकेच आहे.