पुणेPrithviraj Chavan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल अधिकृतपणे मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र, अशोक चव्हाण यांचा भाजपा प्रवेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवडलेला नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात दिली आहे. जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण दिल्लीत प्रवेश करणार होते. त्यानंतर औरंगाबादमध्ये अमित शाह यांच्या बैठकीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, संघाच्या विरोधामुळं त्यांना मुंबईत प्रवेश देण्यात आल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध : "काँग्रेसनं चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळं दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आमचा एकही आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार नाही. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. भाजपाच्या सहा उमेदवारांपैकी चार काँग्रेसचं माजी नेते" असल्याचं सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजपावर टीका देखील केली आहे.
अशोक चव्हाण चौकशीमुळं भाजपामध्ये : "प्रदेशाध्यक्ष बदलण्याची काँग्रेस पक्षात चर्चा सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, अशा चर्चा जाहीर केल्या जात नाहीत. भाजपात सामील झालेल्या लोकांना काय आश्वासन दिलं होतं? कोणाला राज्यसभा, कोणाला मंत्रीपद, कोणाला उपमुख्यमंत्रीपद पदाची ऑफर देण्यात आली होती. अशोक चव्हाण यांच्यामागं चौकशी लागल्यामुळं त्यांना भाजपामध्ये जावं लागलं," अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे.