नवी दिल्ली/मुंबई-2024 च्या लोकसभा निवडणुकीत युती करणारे आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस हे आगामी दिल्ली विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये वाक्युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "काँग्रेस आणि आप यांनी निवडणूक करार केला असता तर चांगले झाले असते. दिल्ली विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. दोन्ही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत." पुढे चव्हाण म्हणाले, "मला वाटतं अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील 'आप' पक्ष मजबूत स्थितीत आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक 'आप' जिंकेल."
काँग्रेसमधून नाराजीच्या प्रतिक्रिया-चव्हाण यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कारण, विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी काँग्रेसमध्ये जिंकण्याचा आत्मविश्वास नाही, याची एक प्रकारे त्यांनी जाहीर कबुली दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित यांनी एका माध्यमाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांना 'आप'मध्ये प्रवेश करण्याचा टोलावजा सल्ला दिला आहे. गेली काही दिवस दिल्लीतील काँग्रेसचे नेते आप सरकारच्या दहा वर्षांच्या कारभारावर सडकून टीका करत आहेत. नुकतेच काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना 'देशद्रोही' म्हणत जोरदार निशाणा साधला. तर 'आप'ने माकन यांना माफी मागण्याकरिता अल्टिमेटम दिला होता.
संजय राऊत हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मताशी सहमत-दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. शिवसेनेचे (युबीटी) खासदार अनिल देसाई यांनी एका माध्यमांशी बोलताना आपला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, पक्षानं अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. शिवसेनेचे खासदार (यूबीटी) संजय राऊत यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हटले, " पृथ्वीराज चव्हाण यांच्या मताशी सहमत आहे. आमच्यासारख्या पक्षांना निर्णय घेणं कठीण जात आहे. विशेषत: विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत असा अनुभव आहे".
केजरीवाल यांना देशद्रोही म्हणणं..पुढे खासदार राऊत म्हणाले, "दिल्लीत आपची काँग्रेसपेक्षा जास्त ताकद आहे. आप जास्त मताधिक्यानं जिंकेल, असे वातावरण आहे. काँग्रेस आणि आप हे इंडिया आघाडीचे सदस्य आहेत. काँग्रेस तर इंडिया आघाडीचं नेतृत्व करत आहे. काँग्रेसनं अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करणं आणि देशद्रोही म्हणणं याचं आमच्या पक्षाला आणि उद्धव ठाकरेंना दु:ख वाटतं. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवावी. पण, कोणीही जिंकले तर तेथील नायब राज्यपालच सरकार चालविणार आहेत. भाजपा कुणालाही काम करू देणार नाही. काँग्रेस आणि भाजपा दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकणार नाही. काँग्रेस आणि भाजपा एकत्र आली असती तर आम्हाला आनंद वाटला असता".
वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा-काँग्रेसमधून नाराजीच्या प्रतिक्रिया उमटल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत सारवासारव केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " दिल्ली विधानसभा निवडणुकीवरील माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. जर 'इंडिया' (आघाडी) एकत्र लढली असते तर आघाडीचा विजय निश्चित झाला असता. आता सर्व प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आले आहेत. ही खुली निवडणूक झालेली आहे. काँग्रेस पक्ष वेगानं काम करत आहे. मला खात्री आहे की आम्ही मोठा विजय मिळवणार आहोत."
हेही वाचा-