महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, नेमका काय दिला कानमंत्र? - PRIME MINISTER NARENDRA MODI

नौदलाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी महायुतीतील आमदारांना मार्गदर्शन केलं.

Prime Minister Narendra Modi guidance MLA
मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2025, 8:04 PM IST

मुंबई-नौदलाच्या ताफ्यात युद्धनौका आणि पाणबुडी समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत महायुतीच्या आमदारांची बैठक घेतली आणि त्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री, राज्यमंत्री आणि आमदार उपस्थित होते. महायुतीमधील बहुसंख्य आमदार यावेळी उपस्थित होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांनी दांडी मारली, त्यामध्ये नाराज असलेले छगन भुजबळ आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मंत्री धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, इद्रीस नाईकवडी, सरोज अहिरे, राजू नवघरे, प्रकाश सोळंके हे यावेळी अनुपस्थित होते. बैठकीबाबत महायुतीचे आमदार, मंत्री फारसे बोलण्यास इच्छुक नव्हते. तर काही आमदार, मंत्र्यांनी मोदींनी या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा केलाय. आमदारांसाठी विधान भवनातून जाण्यासाठी विशेष बसची सोय करण्यात आली होती. मोबाईलदेखील सोबत बाळगण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती.

नव्या-जुन्या सर्व आमदारांना ऊर्जा मिळाली :माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कोणत्याही विद्यापीठात 10 वर्षे शिकल्यावर जितके ज्ञान मिळते, त्यापेक्षा जास्त ज्ञान पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत मिळाले. नव्या-जुन्या सर्व आमदारांना त्यातून नवीन ऊर्जा मिळाली. मी 7 व्या टर्मचा आमदार असून, आजच्या बैठकीमुळे 8 व्या टर्मच्या वेळी आमदार होण्यासाठी लढण्याची इच्छा निर्माण झाल्याचे मुनगंटीवार म्हणाले. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

अनुपस्थित असणाऱ्यांनी चांगला कार्यक्रम मिस केला - मिटकरी :नरेंद्र मोदींनी महायुतीच्या घटकपक्षांच्या आमदारांना वडिलकीच्या नात्याने अनमोल मार्गदर्शन केलंय. त्यांनी स्वतःचे अनुभव कथन केले. जे आजच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते त्यांनी चांगला कार्यक्रम मिस केला, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन (Source- ETV Bharat)

घरचा ज्येष्ठ सदस्य भेटल्यासारखे वाटले - गोगावले :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीमुळे घरातील ज्येष्ठ सदस्य भेटल्याची भावना निर्माण झाल्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले म्हणाले. राजकीय चर्चा अजिबात झाली नाही, असा दावा त्यांनी केलाय.

जनसंपर्क वाढवण्याची सूचना - चित्रा वाघ :जास्तीत जास्त जनसंपर्क वाढवण्याची मोदींनी सूचना केली. सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवा, असा संदेश त्यांनी दिला. घरातील मोठा माणूस समजावतो, त्याप्रमाणे मोदींनी मार्गदर्शन केल्याची माहिती भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी दिली. देशाच्या पंतप्रधान पदावरील एवढ्या मोठ्या माणसाने आमदारांसोबत आपुलकीने वागून गप्पा मारल्या. हा एका प्रकारे कौटुंबिक कार्यक्रम होता. मोदींनी संवाद साधला आणि मार्गदर्शन केले. पंतप्रधानासोबतच्या स्नेहभोजनामुळे आमदार खुश झाल्याचे आमदार रवी राणा म्हणालेत.


हेही वाचा :

  1. माझ्या मुलाला न्याय द्या...; वाल्मिक कराडच्या आईचा परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
  2. मोठी बातमी! वाल्मिक एसआयटीकडून कराडवर मकोकाचा प्रस्ताव, कोर्टात काय घडलं?

ABOUT THE AUTHOR

...view details