कोल्हापूर Droupadi Murmu Kolhapur visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यामुळे कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आणि वारणानगर येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्या ठिकाणांना सध्या पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झालं आहे.
राष्ट्रपती मुर्मू या सकाळी 11 वाजता कोल्हापूर विमानतळावर दाखल होणार आहेत. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन राष्ट्रपती काही काळ सर्किट हाऊस येथे थांबून पुढे कार्यक्रमासाठी वारणेकडंकडे प्रस्थान करणार आहेत. या दरम्यान पोलिसांनी या संपूर्ण मार्गावर आणि कार्यक्रमस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देवीचे दर्शन बंद- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. यामुळे शहरातील वाहतूकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. या दौऱ्यादरम्यान अंबाबाई मंदिराकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गावर मोटार वाहनांची वाहतुक सुरळीत ठेवण्याकरिता दौऱ्या दरम्यान वन वे मार्ग शिथिल करणे, आवश्यकतेनुसार वाहतुक सुरू-बंद करणे आणि मार्ग वळवण्यात आले आहेत. राष्ट्रपती सर्किट हाऊस येथे विश्रांती घेणार आहेत. तेथून त्या वारणा कोडोली येथील कार्यक्रमाला रवाना होणार आहेत.
येथे असणार पार्किंगची सोय-वारणानगर येथे होणाऱ्या कार्यक्रमाकरीता वारणा साखर कारखाना गाडी अड्डा येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या पार्किंगकरिता येणारी वाहने सकाळी 10 पूर्वीच सोडण्यात येणार आहे. त्यानंतर वाठार ते वारणानगर आणि कोडोली ते वारणानगर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कोडोलीकडून कार्यक्रमाकरीता येणारी वाहने श्रीराम मंदिर, भारत गॅसकडून गाडी अड्डाकडे पार्किंग करण्यात येणार आहे. वारणा तालीम समोरील बॅरीकेटींगपासून कोणतेही वाहन पुढे नेण्यास मनाई असणार आहे.
असा असणार पोलीस बंदोबस्त -राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान संपूर्ण दौऱ्या दरम्यान विमानतळ परिसर, अंबाबाई मंदिर, शासकीय विश्रामगृह, रस्त्याच्या दुतर्फा नेमलेले पॉईंट यासह वारणानगर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. बंदोबस्तासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली 3 अपर पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक -12, पोलीस निरीक्षक -36, उपनिरीक्षक -132, पोलीस अंमलदार -1101 , महिला पोलीस -208 वाहतुकीसाठी पोलीस- 273, जलद कृती दल 10 असा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच वारणा कोडोली येथेही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त असणार आहे. कोल्हापूरसह परिक्षेत्रातील सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथून अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
राष्ट्रपतींचा असा असणार तीन दिवसांचा दौरा-राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू 2 ते 4 सप्टेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती 3 सप्टेंबर रोजी, पुणे येथे सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) च्या 21 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत. त्याच दिवशी मुंबई येथे महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी यांच्या हस्ते 4 सप्टेंबर रोजी उदगीर, लातूर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार आहे. उदगीर येथे राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यालाही त्या संबोधित करणार आहेत.