अमरावती Preschool Preparation Campaign: शाळापूर्व तयारी अभियाना अंतर्गत 'पहिले पाऊल' हा विशेष कार्यक्रम राज्यात विभागीय स्तरावर राबविला जात आहे. आज अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ या गावात यानिमित्तानं विभागीय मेळावा आयोजित करून अंगणवाडीतून इयत्ता पहिलीत येणाऱ्या चिमुकल्यांचा शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि भाषा विकास नेमका कोणत्या स्तरावर आहे. यासह त्यांच्या कौशल्याची चाचपणी करून त्यांना इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यासंदर्भात निर्णय घेतला जातो. या विशेष अभियानात चिमुकल्यांसह गमती जमतीत का होईना मात्र, त्यांचे पालक आणि अंगणवाडी सेविकांची देखील परीक्षाच घेण्यात आली.
असं आहे हे अभियान: 'पहिले पाऊल' या उपक्रमा अंतर्गत अंगणवाडीतून इयत्ता पहिलीत येणाऱ्या चिमुकल्यांना अक्षर ओळखता येतं का, फळभाज्यांची त्यांना नावे माहिती आहेत का? यासोबतच आपल्या नातेवाईकांची ओळख ते व्यवस्थित सांगतात का आणि काही जाणून घेण्याच्या आवडीसोबतच खेळण्यात देखील त्यांची किती रुची आहे याची माहिती शिक्षकांकडून घेतली जाते. या अभियानांतर्गत अमरावती विभागाचा खास मेळावा नांदगाव पेठ या गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या आवारात मंगळवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. असाच उपक्रम प्रत्येक शाळेत देखील छोट्या स्तरावर आयोजित करून अंगणवाडीतून इयत्ता पहिलीत येणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता या निमित्तानं तपासली जात आहे.
चिमुकल्यांच्या आरोग्यबाबतही जागृती: केवळ शाळेत प्रवेश द्यायचा हा एकमेव उद्देश या अभियानाचा नाही तर चिमुकल्यांच्या आरोग्यासंदर्भात पालक किती जागृत आहेत याची माहिती घेऊन पालकांना योग्य मार्गदर्शन देखील शिक्षकांच्या माध्यमातून या अभियानाद्वारे केलं जात आहे. वयानुसार एखाद्या विद्यार्थ्याचं नेमकं किती वजन आहे, त्याची किती उंची आहे, याची सर्वात आधी तपासणी केल्यावरच त्याच्या बौद्धिक क्षमतेची चाचणी घेतली जाते. घरातल्या अगदी छोट्या छोट्या वस्तूंची चिमुकल्यांना माहिती आहे का? हे देखील या अभियानांतर्गत जाणून घेण्यात आलं. विशेष म्हणजे पालक आपल्या मुलांसोबत घरात खरंच किती आणि कसा संवाद साधतात याची माहिती देखील या उपक्रमांतर्गत शिक्षकांकडून जाणून घेण्यात आली.