अमरावती Praveen Pote on Navneet Rana : लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा शनिवारी पहिल्यांदाच भाजपाच्या राजापेठ स्थित कार्यालयात आल्या होत्या. त्यांचं भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं. या स्वागत सोहळ्यात विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांनी "अबकी बार 400 पार"मध्ये अमरावतीतून नवनीत राणा यादेखील असणार असं सांगत असतानाच अगोदर आमच्यात जे काही झालं ते आता सारं काही संपलं आहे. राणांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे. अनेकांच्या घरी त्या माफी मागण्यासाठी गेल्या असतील. मात्र, माझ्या घरी येऊन त्यांनी माझी माफी मागितली असल्याचं प्रवीण पोटे यांनी या सोहळ्याला संबोधित करताना सांगितलं आहे.
उद्धव ठाकरेंना आव्हान : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या घरी जाऊन त्यांना हनुमान चालीसा म्हणायला लावण्याचं धाडस नवनीत राणा यांनी केलं आहे. खरंतर नवनीत राणा यांनी जे काम केलं ते माझ्यासह भाजपाच्या सर्वांनी करायला हवं होतं. मात्र, जे धाडस आम्ही करू शकलो नाही ते धाडस नवनीत राणा यांनी केलं असं देखील आमदार प्रवीण पोटे म्हणाले आहेत.
राणांनी आणली हिंदुत्वाची लाट : 'जय श्रीराम'च्या घोषणा देत देशात नव्या दमाने हिंदुत्वाची लाट ही नवनीत राणा यांनी आणली आहे. आता नवनीत राणा ह्या आमच्या अमरावती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवार आहेत. शहर भाजपासह संपूर्ण जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते नवनीत राणा यांना निवडून आणण्यासाठी काम करतील. नवनीत राणा यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात आम्ही बळकट करू असं देखील आमदार प्रवीण पोटे म्हणाले आहेत.
आधी जे झालं ते गंगेला मिळालं :आता जिल्ह्यात आपल्या पक्षामध्ये तुझं आणि माझं हे अजिबात चालणार नाही. यापूर्वी जे काही घडलं ते सार आपण गंगेला वाहिलं आहे. भारत महाशक्ती व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 400 पार उमेदवारांसह निवडून देण्याची आपली जबाबदारी आहे. नवनीत राणा या अमरावती जिल्ह्यातून बहुमताने निवडून येतील यासाठी आपण सारे आजपासून कामाला लागलो असल्याचं प्रवीण पोटे म्हणाले आहेत.