ठाणे Post Office Raksha Bandhan :रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच दूर राहणाऱ्या भावांना राखी पोहचवण्याकरता पोस्टाच्या माध्यमाचा आधार घेतला जातो. याच पार्श्वभूमीवर पोस्ट विभागानं आकर्षक रंगीबेरंगी असे 'राखीचे लिफाफे' (Rakhi Envelopes) यंदा तयार करण्यात आले आहेत. लवकरात लवकर योग्य त्या पत्त्यावरती राखी पोहोचवण्याकरता विशेष सेवा सज्ज करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया देताना प्रवर अधीक्षक समीर महाजन (ETV BHARAT Reporter)
खास डिझाईन केलेले राखी लिफाफे : 'रक्षाबंधन' हा भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याचा दिवस. यादिवशी खरेतर बहिण भावाला राखी बांधते. परंतु दूरवर असलेल्या भावाला राखी पोहोचवण्याकरता वर्षानुवर्षे पोस्ट विभाग सेवा पुरवत आहे. रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी ठाणे टपाल विभाग सज्ज झाला आहे. विभागाने खास डिझाईन केलेले राखी लिफाफे आणले आहेत. जे प्रथम श्रेणीचे मेल म्हणून भारतात आणि परदेशात कुठेही नाममात्र दराने पाठवले जातील. हे लिफाफे रक्षाबंधनासाठी खास वॉटरप्रूफ केले आहेत. गुलाबी, हिरव्या, जांभळ्या आणि भगव्या रंगातील हे आकर्षक असे लिफाफे आहेत. हे लिफाफे सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असतील. या लिफाफ्यांच्या कव्हरवर राखीची डिझाइन छापण्यात आली आहे. ज्यामुळं आम्हाला हे मेल इतरांपासून वेगळे करण्यात मदत होणार आहे, असं ठाणे टपाल विभागानं कळविलं आहे.
राखी लिफाफ्यांची किंमत :राखी लिफाफे सोयीस्कर आकारात उपलब्ध आहेत. सहज सील करण्यासाठी पील ऑफ स्ट्रिप सीलची सोय देखील करण्यात आलीय. तसंच हे लिफाफे आकर्षक डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत. या राखी लिफाफ्यांची किंमत जीएसटीसह प्रति लिफाफा 12 रुपये इतकी आहे. हे राखी लिफाफे संपूर्ण भारत आणि परदेशात स्पीड पोस्ट आणि नोंदणीकृत पोस्ट सेवांद्वारे पाठविले जाऊ शकतात. राखी योग्य त्या पत्त्यावरती लवकरात लवकर पोहोचण्याकरिता पोस्ट विभागाचा हा प्रयत्न आहे.
पोस्ट पाकिटाची विक्री : गेल्यावर्षी 5000 हून अधिक पोस्ट पाकिटाची विक्री झाली होती. तर यंदा देखील नवीन डिझाईन केलेल्या पकिटाना पसंती मिळेल. महाराष्ट्राच्या बाहेर एक ते दोन दिवसांमध्ये राखी योग्य त्या पत्त्यावरती पोहोचवण्याची सेवा पोस्ट विभागाच्या वतीनं दिली जाणार आहे. त्याचबरोबर 'ऑनलाईन राखी पोस्ट' या नावाने ही सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती, प्रवर अधीक्षक डाकघर समीर महाजन यांनी दिली. बहिणींनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे टपाल विभागानं केलंय.
हेही वाचा -
- Raksha bandhan 2023 : भावाला मृत्यूपूर्वी दिलेल्या वचनाचा बहिणीला पडला नाही विसर, वाचा सविस्तर बातमी
- Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनानिमित्त 'या' कारागिरानं बनवली जगातील सर्वात लहान सोन्याची राखी!, वाचा स्पेशल रिपोर्ट
- World Largest Rakhi : कधीकाळी दरोडेखोरांचा जिल्हा असलेल्या चंबळमध्ये जगातील सर्वात मोठी राखी, पहा व्हिडिओ