पुणेIAS Officer Pooja Khedkar : पुण्यातील IAS अधिकारी पूजा खेडकर वाशिमधील बदलीनंतर चर्चेत आहेत. नागरी सेवा परीक्षेतील त्यांच्या निवडीच्या अनुषंगानं त्यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दृष्टिहीन तसंच मानसिक आजारी असल्याचा दावा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला आहे.
विजय कुंभार माहिती देताना (ETV BHARAT Reporter) पूजा खेडकर यांच्याकडं 17 कोटी संपत्ती : पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 40 कोटी असल्याचं नमूद केलं आहे. त्यांच्या वडिलांची संपत्ती लक्षात घेता पूजा खेडकर यांच्या ओबीसी नॉन-क्रिमी लेयरबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, असं विजय कुंभार यांनी सांगितलं. तसंच त्यांच्या आई-वडिलांकडं 110 एकर शेतजमीन आहे. त्यामुळं त्यांनी शेतजमीन कायद्याचंही उल्लंघन केलं आहे. तसंच पूजा खेडकर यांच्याकडं 17 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं कुंभार यांनी सांगितलं.
"पूजा खेडकर यांनी अपंगत्व प्रमाणपत्राचा वापर करून यूपीएससीमध्ये निवडीसाठी विशेष सवलत मिळवली. एवढंच नाही, तर सवलतींमुळं परीक्षेत कमी गुण मिळूनही पूजा खेडकर यांनी परीक्षा पास केली. मात्र, परीक्षेत निवड झाल्यानंतर त्यांना अपंगत्वाची वैद्यकीय चाचणी करावी लागली. मात्र त्यांनी वैद्यकीय तपासणी प्रक्रियेत 6 वेळा सहभागी होण्यास नकार दिला. 22 एप्रिल 2022 रोजी दिल्लीच्या एम्समध्ये त्यांची पहिली वैद्यकीय तपासणी झाली होती. यानंतर सफदरजंग रुग्णालयात 26 तसंच 27 मे रोजी घेण्यात आलेल्या चाचण्याही रद्द करण्यात आल्या. 1 जुलै रोजी देखील त्या हजर झाल्या नाहीत. त्यामुळं अशी मानसिक अजारी व्यक्ती IAS कशी होऊ शकते असा प्रश्न उपस्थित होत आहे.- विजय कुंभार, सामाजिक कार्यकर्ते
तक्रारींमुळं वाशीमला बदली :खेडकर यांच्या विरोधातील तक्रारींमुळं महाराष्ट्र सरकारनं त्यांची पुण्याहून वाशीमला बदली केलीय. त्यानंतर अनेक बाबी उघडकीस आल्या. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांची आता वाशिममध्ये अतिरिक्त सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातील प्रोबेशन दरम्यान त्यांनी अनेक सुविधांची मागणी केली होती, ज्या प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना मिळत नाहीत. तसंच त्यांनी लाल - दिवा, व्हीआयपी नंबर प्लेट असलेली वैयक्तिक ऑडी कार वापरली. त्यांनी गाडीवर 'महाराष्ट्र सरकार' बोर्ड लावल्याचं दिसून आलं आहे. खेडकर यांचे वडील निवृत्त प्रशासकीय अधिकारी असून त्यांनी पूजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर दबाव आणल्याचा आरोप आहे.
खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया - पूजा खेडकर यांनी आजच वाशिमच्या अतिरिक्त सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार हाती घेतला आहे. त्यांना सरकारी नियमाप्रमाणे जे काम द्यायचं आहे, ते देण्यात येईल. असं तेथील जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी यांनी माध्यमांना सांगितलं. त्याचबरोबर खेडकर यांनी आपण कार्यभार घेतल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांच्याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारलं असता, त्यावर आपण काही बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यासंदर्भात सरकार योग्य तो निर्णय घेईल ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली.
हे वाचलंत का :
- 110 एकर शेतजमीन, 7 फ्लॅट्स अन् 17 लाखाचं घड्याळ... आयएएस पूजा खेडकर यांची संपत्ती ऐकून तुम्हीही व्हाल थक्क! - pooja Khedkar Property
- दृष्टिदोष दाखवून पूजा खेडकर आयएएस, सरकारनं चौकशी करावी; सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी - Pooja Khedkar IAS
- अखेर त्या परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम इथं बदली; जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती तक्रार - Controversial IAS Officer