महाराष्ट्र

maharashtra

रवींद्र चव्हाण-रामदास कदम यांच्यात रंगला 'कलगीतुरा'; देवेंद्र फडणवीस म्हणाले,"मुख्यमंत्र्यांसोबत बसून मी.." - Ramdas Kadam Vs Ravindra Chavan

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 19, 2024, 7:53 PM IST

Updated : Aug 19, 2024, 9:05 PM IST

शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गवरून 'घरचा आहेर' दिल्यानं महायुतीमधील अंतर्गत कलह समोर आले आहेत. रामदास कदम यांच्या टीकेला मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. याचबरोबर महायुतीमधील नेत्यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली.

RAMDAS KADAM VS RAVINDRA CHAVAN
रामदास कदम रवींद्र चव्हाण वाद (Source- ETV Bharat Marathi)

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. पण, यावेळेला सत्ताधारी आणि विरोधक नव्हे तर शिवसेना शिंदे पक्ष विरुद्ध भाजपा असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. याला निमित्त ठरले,शिवसेना नेते रामदास कदमयांनी केलेलं विधान! मुंबई- गोवा महामार्ग १४ वर्षांत झाला नाही, हे सांगताना रामदास कदम यांनी थेट रामाच्या वनवासाशी तुलना केली. एवढेच नव्हे तर त्यांनी थेट "कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा," अशा शब्दात टीकास्त्र सोडले. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही तीस वर्षे शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करताना काय उपटले ? असा सवाल केला.

रवींद्र चव्हाण यांची रामदास कदम यांच्यावर टीका (Source- ETV Bharat)


काय म्हणाले रवींद्र चव्हाण?मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांच्यावर पलटवार केला. मंत्री चव्हाण म्हणाले,"ते पंधरा वर्षे मंत्री होते. तीस वर्षे शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होताना काय उपटले? तो अडाणी माणूस आहे. मला त्यांच्यावर टीका करायला आवडत नाही. मात्र, त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये दिले. त्यामुळे त्यांनी माझे आभार मानले पाहिजेत. हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे."


तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही-मंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, "कधीतरी रस्त्यात समोरासमोर आल्यावर कशा भाषेत मला बोलता येतं, हे दाखवेनं. त्यावेळेला कोणी वाचवायला राहणार नाही, हे लक्षात ठेवा. युतीधर्म पाळतोय याचा अर्थ कोणीही काही बोलले तर आम्ही ऐकून घेणार नाही. तोंड सांभाळून बोलले नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही. मुंबई-गोव्याच्या खराब रस्त्यामुळे महायुतीमधील दोन घटक पक्षातील संबंध ताणले आहेत."


मंत्र्यांच्या तोंडी तोडाफोडीचा भाषा शोभत नाही-मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या इशारानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी रविंद्र चव्हाण यांचा एकेरी उल्लेख करत समाचार घेतला. रामदास कदम म्हणाले, "कोकणातील लोकं आम्हाला प्रश्न विचारत आहेत. फक्त महामार्गाच्या कामाची पाहणी केली जाते. परंतु, यावर तोडगा काही निघत नाही. रवींद्र चव्हाणांना सार्वजनिक बांधकाम खात सांभाळण्याची लायकी नाही," अशी बोचरी टीका रामदास कदमांनी मंत्री रविंद्र चव्हाणांवर केलीय. तसेच "एका मंत्र्यांच्या तोंडी तोडाफोडीचा भाषा शोभत नाही," असंही कदम म्हणालेत.


हे आम्हाला मान्य नाही-"रामदास कदम हे वरिष्ठ नेते आहेत. अनुभवी नेते आहेत. त्यांचा स्वभाव आक्रमक आहे. परंतु, मागील कित्येक दिवसांपासून वारंवार ते भाजपाला बोलत आहेत. हे आम्ही ऐकलं आहे. परंतु हे आम्हाला मान्य नाही. याबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहोत. जे वाद असतील ते अंतर्गत वाद मांडा. पण असे उघडपणं एखाद्या मंत्र्यासोबत आव्हानात्मक भाषा वापरणं किंवा इशारा देणं योग्य नाही. याबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बसून चर्चा करणार आहोत. जो काय वाद असेल, त्यावर चर्चा करू. वाद सोडवू," असं रवींद्र चव्हाण-रामदास कदम यांच्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.



महायुतीत अंतर्गत मोठे वाद-रवींद्र चव्हाण-रामदास कदम यांच्या वादावर सत्ताधारी-विरोधकांकडून प्रतिक्रिया येत असताना आता शिवसेना (ठाकरे गटाच्या) उपनेता सुषमा अंधारे यांनीही या वादावरून प्रतिक्रिया दिली आहे. "महायुतीत सर्वकाही आलबेल नाही, हे दिसून येतंय", अशी त्यांनी टीका केली आहे. "रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम हे आता एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देत आहेत. तसेच दररोज महायुतीतील नेते एकमेकाची उणीधुणी काढत आहेत. याची आता अशी परिस्थिती आहे. तर मग जागा वाटपाच्या वेळी तर याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होणार आहे. कदम-चव्हाण एकमेकांचे तोंड फोडण्याची भाषा करताहेत. यावरूनच यांच्यात अंतर्गत मोठे वाद असल्याचे दिसून येत आहे," अशी टीका सुषमा अंधारे यांनी कदम-चव्हाण वादावर केली आहे.

हेही वाचा-

Last Updated : Aug 19, 2024, 9:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details