मुंबई Marathi Classical Language :विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारनं मराठी जनतेची एक मागणी पूर्ण केलीय. केंद्र सरकारनं मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीप्रतिक्रिया दिली आहे.
"मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल"-नरेंद्र मोदी,पंतप्रधान
"माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!! अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आलं. यासाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडं सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झालं. त्यांचंही मन:पूर्वक आभार!"- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय हा मराठी भाषेसाठी ऐतिहासिक असून आजचा दिवस सोनेरी दिवस आहेत. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्यानं आम्ही पाठपुरावा केला". -देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
"मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयानं जगभरातील मराठी भाषिक, मराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही महाराष्ट्राची गेल्या अनेक दशकांची मागणी होती. या निर्णयामुळं मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोहोचेल, मराठी भाषा ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा बनण्यास मदत होईल. महाराष्ट्रासाठी हा अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे मी मनापासून आभार मानतो." अजित पवार, उपमुख्यमंत्री
आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. निवडणुकीत पराभव ही एकमेव गोष्ट आहे. ज्यामुळं केंद्र सरकार निर्णय घेते, हे स्पष्टच आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने का होईना, आज आपल्या मायबोलीला मानाचे स्थान मिळाले आहे, दहा वर्षाची प्रतिक्षा आज संपली. - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते
हेही वाचा -
- '...परि अमृतातेहि पैजासी जिंके', 'अभिजात' मराठी! - Marathi Language Classical Language
- Elite Status for Marathi: मुख्यमंत्र्यांच्या पत्राला पंतप्रधानांकडून वाटाण्याच्या अक्षता; अभिजात दर्जापासून मराठी भाषा वंचित
- का साजरा करण्यात येतो मराठी भाषा गौरव दिन, जाणून घ्या मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिनातील फरक