नागपूर Dr Ambedkar Jayanti 2024 : देशातील कोट्यवधी बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमी येथे (Diksha Bhoomi) आज भीमसगर लोटलाय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या 133 व्या जयंती निमित्त आज लाखो बौद्ध अनुयानांतर्फे अभिवादन करण्यात आलंय. सकाळपासूनच शेकडो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीत नतमस्तक झाले आहेत. तर दुसरीकडं आज नेत्याच्या ही रांगा लागल्या आहेत. देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), जयंत पाटील (Jayant Patil) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh), काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी दीक्षाभूमी येथे येऊन अभिवादन केलं आहे.
माणूस हा जातीनं नाही गुणानं मोठा होतो : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दीक्षाभूमी येथे हजेरी लावली. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजातली जी अस्पृश्यता, जातीयता नष्ट झाली पाहिजे. सामाजिक समता, आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे हा विचार त्यांनी दिला. माणूस हा जातीनं नाही गुणानं मोठा होतो. डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं.आम्हाला सगळ्यांना आयुष्यभर समाजाकरता आणि देशाकरता चांगलं काम करण्याची प्रेरणा ते देत राहतील.
संविधानामुळं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला: देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज दीक्षाभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन केलं. क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला असं संविधान दिलं की, ज्या संविधानामुळं आपल्या देशामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला. समतेच राज्य स्थापित करण्याचा मार्ग मोकळा झाला. आज प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात एक मजबूत देश तयार होतोय. कारण भारताचं संविधान हे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील म्हणतात कुठल्याही ग्रंथापेक्षा भारताचं संविधान हे जास्त महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की, संविधानामुळं आज भारत प्रगतीकडं चाललेला आहे. बाबासाहेब आंबेडकर देशाचे कायदे मंत्री होते. त्या काळामध्ये इरिगेशन, पावर आणि लेबर यामध्ये मूलभूत काम केलं त्याच्यावरच आज आपला देश उभा आहे. म्हणून अशा या महामानवाला अभिवादन करण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.