महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 'या' दिग्गजांनी दाखल केले अर्ज, राजकीय पक्षांपुढे बंडखोरांना थोपवण्याचं मोठं आव्हान - CANDIDATE NOMINATION APPLICATION

राज्यभर अनेक राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यात भाजपाचे बावनकुळे, काँग्रेसच्या पटोलेंसह मुंबईत शिवसेना (शिंदे गटाकडून) शायना एनसी यांनी अर्ज दाखल केलेत.

Milind Deora and Shaina NC
मिलिंद देवरा आणि शायना एनसी (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2024, 6:06 PM IST

मुंबई -विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज (मंगळवार) शेवटचा दिवस आहे. तर 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आलीय. दरम्यान, आज (मंगळवारी) राज्यभर अनेक राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह मुंबईत शिवसेना (शिंदे गटाकडून) शायना एनसी यांनी अर्ज दाखल केलेत.


बावनकुळेंच्या एबी फॉर्मवर अध्यक्ष या नात्याने स्वत:चीच स्वाक्षरी : 2019 विधानसभा निवडणुकीत ज्या चंद्रशेखर बावनकुळेंना पक्षाने तिकीट नाकारले होते. त्याच चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपा पक्षाने पुढे प्रदेशाध्यक्ष केले. योगायोग म्हणजे आज काटोल मतदारसंघातून अर्ज दाखल करताना चंद्रशेखर बावनकुळेंच्या एबी फॉर्मवर अध्यक्ष या नात्याने स्वत:च्या अर्जावर स्वत:चीच स्वाक्षरी केलीय. दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलाय. वरळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात अर्ज दाखल केलाय. त्यामुळे वरळीत तिरंगी लढत पाहयला मिळणार आहे. तसेच विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार सदा सरवणकर यांना विरोध असताना त्यांनीही दोन अर्ज दाखल केल्याचं बोललं जातंय. एकानं पक्षातर्फे तर दुसऱ्यानं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. माजी आमदार तृप्ती सावंत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उमेदवारी दिलीय. यानंतर त्यांनी वांद्रे पूर्वमधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

बंडखोरांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज:दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे आणि तिकीट न दिल्यामुळं बंडखोरीला ऊत आलाय. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना पक्षाने तिकीट न दिल्यामुळे त्यांनी बंड केलाय. भाजपाकडून संजय उपाध्ये यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर भाजपाच्या प्रवक्त्या शायना एससी यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाकडून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार अर्ज दाखल केलाय. यामुळे माजी आमदार अतुल शाह नाराज झाले असून, शाह यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी शेवटपर्यंत पक्षाकडून तिकीट मिळेल म्हणून वाट पाहिली. पण अखेर त्यांनीही बंड करत मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे आता बंडखोरांना शांत करणं राजकीय पक्षांपुढे खरं आव्हान आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details