महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नायलॉन मांजा' विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर; आढळून आल्यास तडीपार, मोक्का अंतर्गत कारवाई - NYLON MANJA BAN NASHIK

संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात. मात्र, त्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो. हा मांजा पक्षांबरोबर माणसांच्याही जीवाला धोका निर्माण करत आहे.

NYLON MANJA BAN NASHIK
नायलॉन मांजा विक्रिवर बंदी (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2024, 8:55 PM IST

नाशिक :नायलॉन मांजा वापरावर बंदी असतानाही उत्‍पादन, विक्री व वापर करत असलेल्‍या व्‍यक्‍तींवर कठोर कारवाई होणार आहे. नाशिक पोलीस आयुक्तांकडून घातक नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आलेल्या आरोपींची यादी तयार करण्यात येत आहे. आरोपींवर आता मोक्का तसंच तडीपार अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

कडक कारवाईचे आदेश :मकरसंक्रात सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात ठिकठिकाणी पतंग, मांजांची दुकानं थाटली आहे. या पार्श्वभूमीवर चायनीज मांजा, नायलॉन मांजा, काचेचा चूऱ्याचे कोटिंग असलेला मांज्याची विक्रीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बंदीचे आदेश दिले आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस उपयुक्त प्रशांत बच्छाव (Source - ETV Bharat Reporter)

दोघांना तडीपार करणार : नाशिक शहरातील पंचवटी परिसरात राहणारे शुभम अहिरे आणि इमरान शहा यांच्याकडून पोलिसांनी 65 हजार 800 रुपये किमतीचा नायलॉन मांजाचे 99 गट्टे जप्त केलेत. या संदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही तडीपार करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.

नायलॉन मांजामुळं मुलाचा मृत्यू : 9 नोव्हेंबर 2024 रोजी वडाळा गावातील नऊ वर्षीय विष्णू जोशी हा मुलगा खेळत असताना नायलॉन मांजा मांडीला त्याच्या चिरून गेल्यानं अतिरक्तस्त्राव झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्याची प्रकृती अधिकच खालावल्यानं त्याचा मृत्यू झाला. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

37 मांजा विक्रेत्यांवर कारवाई : जीवघेण्या नायलॉन मांजा विक्रीला बंदी असतानाही नाशिक शहरात छुप्या पद्धतीनं विक्री केली जात होती. जानेवारी 2024 मध्ये नाशिक पोलिसांनी कारवाई करत 37 नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई केली होती. यापुढे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पालकांवर होणार कारवाई : "नायलॉन मांजा विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. यापुढेही नायलॉन मांजाद्वारे पतंग उडवण्यावर व त्यांच्या पालकांवरही कारवाई केली जाईल," असं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलं.

खंडपीठाचा महत्त्वपूर्ण आदेश : मांजा सापडेल ते ठिकाण सील करावं. अल्पवयीन मुलांकडे नायलॉन मांजा कुठून आणला याची माहिती लपवली तर पालकांवरही गुन्हा दाखल करावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.

हेही वाचा

  1. विरोधकांचं वागणं म्हणजे मायबाप जनतेचा अपमान - प्रवीण दरेकर
  2. एशियन पेंटच्या नावाखाली मद्य तस्करी कंटेनरसह 55 लाखांचा मद्यसाठा जप्त
  3. राहुल नार्वेकर पुन्हा अध्यक्षपदाच्या रिंगणात? सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details