लातूर Police Sacrificed Goat: दिवसेंदिवस गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असल्यानं शांती करण्याच्या हेतूनं अंधश्रद्धेतून पोलीस ठाण्याच्या गेटवर बोकड कापल्याची धक्कादायक घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे. लातूरच्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली असून त्यांनी ही घटना निषेधार्य असल्याचं म्हटलंय. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत "उपनिरीक्षकांनी नवीन गाडी घेतल्यानं ही पार्टी देण्यात आली आहे. मात्र हे चुकीचं असून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत," असं त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं.
बोकड्याच्या बळीनंतर बिर्याणीचा आस्वाद : मागील वर्षभरात उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंभीर गुन्हे आणि अपघात होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत. यावर उपाय म्हणून बोकडाचा बळी देण्याची अफलातून कल्पना याच पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं सूचवल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानुसार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर बोकड आणून तो पोलीस ठाण्याच्या गेटवर कापण्याची जबाबदारी सोपविली. त्यानुसार एक बोकड आणि त्याला कापणारा कसाई ठाण्यात आणून सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गेटवर बोकडाचा बळी देण्यात आला. बोकडाचा बळी दिल्यानंतर पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी त्याचं फोटो सेशन केलं. त्यानंतर उदगीर शहाराच्या नजीक मलकापूर शिवारात एका राजकीय पुढाऱ्याच्या फार्म हाऊसवर बोकड नेला. सायंकाळी बोकडाच्या बिर्याणीचा उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी येथेच्छ आस्वाद घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.
काय म्हणाले पोलीस निरीक्षक : याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार म्हणाले की, "आमच्या पोलीस ठाण्यात जातीयवाद आणि गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे. 4-5 लॉबी या ठाण्यात कार्यरत आहेत. शिवाय या ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल यांनी नुकतीच नवीन गाडी खरेदी केलीय. त्या गाडीची पार्टी त्यांनी केलीय. या घटने संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले असून त्याचा अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगितलं आहे," असं त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी दूरध्वनीवरुन बोलताना सांगितलंय.