नांदेड/परभणी : पोलिसांच्या मारहाणीत सोमानाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूवरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यास सुरुवात केली. आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी मागासर्वगीय असल्यानंच पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या केली, असा आरोप केला. राहुल गांधी यांनी थेट पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केल्याचा आरोप केल्यानं प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राहुल गांधी यांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट :राहुल गांधी यांचं नांदेड विमानतळावर आज आगमन झालं. त्यानंतर त्यांनी परभणी इथं जाऊन सोमनाथ सूर्यवंशी याच्या परिवाराची भेट घेतली. राहुल गांधी नांदेड विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. यावेळी राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आल्या आहेत. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याच्या परिवाराचं राहुल गांधी यांनी सांत्वन करुन परिवाराशी चर्चा केली. तर दुसरीकडं आंबेडकरी नेते पँथर विजय वाकोडे यांचं हृदयविकारानं निधन झालं, ते आंदोलनात सहभागी होते. त्या निमित्तानं विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांचीही राहुल गांधी भेट घेणार आहेत. यावेळी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, खासदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्यासह इतर प्रमुख काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.