नाशिक Dwarka Doke Climbed Mount Everest:महाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस निरीक्षक द्वारका विश्वनाथ डोके यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केलं आहे. आई-वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यासह महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज फडकावण्यासाठी वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी हा विक्रम केला आहे. माउंट एव्हरेस्ट मोहीम फत्ते करणाऱ्या पोलीस निरीक्षक द्वारका डोके राज्य पोलीस दलातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
54 दिवसात माउंट एव्हरेस्ट शिखर सर :जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तीन वर्षांपासून त्या प्रयत्न करत होत्या. त्यात त्यांना अपयश आल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. दुसऱ्या प्रयत्नात 54 दिवसात माउंट एव्हरेस्ट शिखर सर करून त्यांनी पोलीस दलाचे नाव उंचावले आहे. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या राज्यातील त्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी असल्याचा दावा द्वारका डोके यांनी केला आहे.
अपयश आल्यानंतर गाठलं यश : महिला पोलीस अधिकारी द्वारका डोके या मूळच्या श्रीरामपूर येथील असून 2006 मध्ये सरळ भरती सेवेतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाल्या होत्या. 2022 पासून त्यांना एव्हरेस्ट मोहिमेबाबत कुतूहल होतं. त्यावेळी त्यांना त्रास जाणवल्यानं एव्हरेस्ट मोहिम मधूनच सोडावी लागली होती. 2023 मध्ये त्यांनी पुन्हा मोहिमेची तयारी केली. इंडोरमा ट्रेनिंग, एमपीएमध्ये त्यांनी मोहिमेचा सराव सुरू केला होता. त्यांनतर 24 मार्चला त्यांनी नेपाळची राजधानी काठमांडू गाठत लकपा शेरपा यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेत सहभागी घेतला. त्यामुळं 54 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम केला आहे.