मुंबई Salman Khan Firing Case : बॉलीवूडमधील भाईजान अशी ओळख असलेला प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील बांद्रा इथल्या घरावर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर बांद्रा पोलिसांनी 2 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेतील तीन सशंयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या गोळीबाराची गंभीर दखल पोलिसांसह राज्य सरकारनं देखील घेतली आहे. रविवारपासून मुंबईत ठीक-ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईच्या सीमेबाहेर जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणात आता दिल्ली पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांचं देखील लक्ष असणार आहे.
तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात :या गोळीबारानंतर काही तासातच रविवारी या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्विकाल्याची आहे. अनमोल बिश्नोई यानं फेसबुक पोस्टवरुन या गोळीबाराची जबाबदारी स्विकारली आहे. हल्लेखोरांनी वापरलेल्या दुचाकी बांद्रा येथील एका चर्चच्या बाहेरुन पोलिसांनी जप्त केल्या. या गोळाबारात वापरलेली दुचाकी मुंबई पोलिसांना पुरावा म्हणून मिळाली आहे. जप्त केलेल्या दुचाकीचा तपास फॉरेन्सिक टीम करत आहे. यासह सलमान खानच्या घरात एक गोळी सापडली असून त्याचाही तपास सुरू आहे. आरोपी महाराष्ट्रबाहेरुन आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या गोळीबारानंतर आरोपी पश्चिम द्रुतगती मार्गानं दहिसरच्या दिशेनं निघालं होते. पळून जाताना आरोपींनी स्थानिक लोकांना एक्स्प्रेस वेचा रस्ता विचारल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याचा तपास केला असता, तीन सशंयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच गोळीबारानंतर पोलिसांच्या 15 ते 20 टीम या आरोपींच्या मागावर होत्या. तिन्ही संशयितांची सध्या चौकशी सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.